Tue, Jul 16, 2019 09:52होमपेज › Belgaon › चामुंडेश्‍वरी कोपेल, इथे तर ‘बाद मी’ नाही ना!

चामुंडेश्‍वरी कोपेल, इथे तर ‘बाद मी’ नाही ना!

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 15 2018 1:47AMअचानक सार्‍यांच्या नजरा गुहांकडे वळल्या. कोणालाच काही समजेना. लेण्यांच्या या शहराला आताच इतके महत्त्व का आले? येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. पण आज पर्यटकांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचीच संख्या तोबा होती. लेण्यांमध्ये काही फरक फडला की काय, अशी शंका अनेकांना चाटून गेली. कोणी म्हणाले, लेण्यांतून चित्रविचित्र आवाज ऐकू येत आहेत, तेथील चित्रे आपोआप रंग पालटत आहेत....असं बरंच काही. कानोकानी या वार्ता गेल्या आणि त्या लगेच व्हायरलही झाल्या. यातली सत्यासत्यता तपासण्यासाठी आणि हा विषय जितका लावता येईल तितका प्रसारित करण्याची नामी संधी मिळाल्यामुळे मीडियावाल्यांनीही तिकडे धाव घेतली. त्यांनी आपापल्या छत्र्या उघडल्या आणि येणार्‍या जाणार्‍यांशी संवाद सुरू झाला.

तिकडे चामुंडेश्वरीतले वातावरण थोडे तप्‍तच होते. तेथे सिध्दय्या ठाण मांडून होते. एका सभेत कुमारांनी इशारावजा डरकाळी फोडली, तशी आपल्या पायाखालची वाळू सरकतेय की काय, असा भास सिध्दय्यांना झाला. कारण कुमार यांच्या हाकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ते ऐकून सिध्दय्या पार हबकून गेले. 

चामुंडेश्वरीतील चित्र आणि परिस्थिती केंद्रातील खबर्‍यांनी थेेट युवराजांकडे पाठवली. युवराज मठ, मंदिरे, चर्च आदीच्या दर्शनात मग्‍न होते. त्यांनी आपल्या स्वीयकरवी हे सारे पाहण्यास अर्जुनाला सांगितले. अर्जुनाने आपले ताणलेले धनुष्यबाण खाली टेवले आणि मोबाईलवरचा मेसेज वाचला. आपल्याला ही आयती संधी चालून आली, या आनंदात त्यांनी युवराजांकडे हजेरी दिली. 

कर्नाटकातील प्याद्यांची नावं जाहीर करताना जरा सबुरीनं घ्यावं लागेल. कारण सिध्दय्या लढवू पाहत असलेल्या जागी जागृत चामुंडेश्वरी आहे. म्हणून म्हटलं. उगाच अपशकुन नको. अर्जुन हे युवराजांच्या खास मर्जीतले असल्याने त्यांचे आर्जव टाळता येणार नव्हते. यामुळं राज्यातली पहिलीच यादी रेंगाळली.  यावरून राज्यात पटापट वेगवेगळे मेसेज पास झाले. 
राज्यातले आप्पा काय आणि कुमार, सिध्दय्या काय, सारेच कट्टर धार्मिक. देवदेवस्कीवर प्रचंड विश्वास. खुद्द युवराजच लोटांगण घालत फिरताहेत, मग तेथे यांचे काय?

त्या रात्री सिध्दय्यांना का कोण जाणे लवकरच झोप लागली. पहाटे साखरझोपेत त्यांना स्वप्न पडले. चामुंडेश्वरी कोपली आहे. हातात सर्व शस्त्र-अस्त्रं आहेत. ‘तू येथे आपटी खाशील. सावध हो.’ सिध्दय्या खाडकन जागे झाले. त्यांनी स्नान वगैरे लवकर उरकून थेट पारंपरिक जोतिषाचे घर गाठले. त्याला स्वप्न कथन केले. 
ज्योतिषी म्हणाले, ‘पहाटेची स्वप्नं 90 टक्के खरी होतात. आपण दुसरा पर्याय शोधायला हवा. आता संधी गेली तर पुन्हा येणे नाही.’

या ज्योतिषावर सिध्दय्यांचा अनुभवातून आलेला विश्वास होता. कारण ‘काकस्पर्शा’वेळी त्याच्या सांगण्यावरूनच त्यांनी कार बदलल्याची चर्चा गाजली होती. म्हणूनच त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत राहिली. सिध्दय्यांनी लागलीच आपण लेणीक्षेत्रातून उतरणार असल्याचे जाहीर केले. चामुंडेश्वरी कोपली, आता येथून ‘बाद मी’ होणार नाही ना. अशी पुसटशी शंका सिध्दय्यांच्या मनात विजेसारखी चमकून गेली!

- सुनील आपटे

Tags :    blog,Chamundeswari , here and there, 'I am not' I do not,