Mon, May 20, 2019 18:14होमपेज › Belgaon › ‘वादग्रस्त’चा उल्लेख ठरतोय सीमाभागातील विद्यार्थ्यांची डोकेदुखी

‘वादग्रस्त’चा उल्लेख ठरतोय सीमाभागातील विद्यार्थ्यांची डोकेदुखी

Published On: Jul 06 2018 1:31AM | Last Updated: Jul 05 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात व्यावसायिक शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थाकडून जी-1 व जी-2 दाखल्यासाठी विद्यार्थ्यांवर सक्ती करण्यात येत आहे. हा अर्ज मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे सदर जाचक अट शिथिल करण्याची मागणी विद्याथ्यार्र्ंतून होत आहे.

सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यासाठी जी-1 व जी-2 अर्ज सक्तीचा आहे. यावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांची सही आवश्यक असते. मात्र अर्जावर असणार्‍या वादग्रस्त उल्लेखामुळे सही करण्यास संबंधित अधिकार्‍याकडून नकार देण्यात येत आहे. 

महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक शिक्षणात महाराष्ट्राने दावा केलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना शिक्षणात राखीव जागा ठेवल्या आहेत. या कोट्यातून निवड झालेल्या सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी आणि सवलती अदा करण्यात येतात. परंतु, महाराष्ट्र शिक्षण विभागाने जी-1 व जी-2 अर्जाची सक्ती केली आहे. यामध्ये नमूद करण्यात आलेला 

विद्यार्थी सीमाभागातील ‘वादग्रस्त’ गावात राहत असल्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यातील ‘वादग्रस्त’ शब्दावर अधिकार्‍याकडून आक्षेप घेण्यात येत आहे. त्यांच्याकडून अशा अर्जावर सही करण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे अर्जावरील सदर उल्लेख हटविण्याची गरज निर्माण झाली आहे.

वादग्रस्त उल्लेखाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्याऐवजी महाराष्ट्र शिक्षण विभागाने रहिवासी दाखला ग्राह्य धरावा अशी मागणी होत आहे. अन्यथा राखीव असणार्‍या जागांपासून सीमाभागातील विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागणार आहे.