Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांसमोरील आव्हाने कायम

सिद्धरामय्यांसमोरील आव्हाने कायम

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 8:54PMदेशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस नव्या घटना घडत आहेत.  काही घटनांची नांदी आताच स्पष्टपणे दिसू लागली आहे. एकेकाळी जनता दल धर्मनिरपेक्षचे महत्त्वाचे नेते असणारे सिद्धरामय्या आता पुरेपूर काँग्रेसवासी झाले असले तरी त्यांच्यासमोरील काही आव्हाने आजही कायम आहेत. काँग्रेसच्या या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारास भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणारे बी. एस. येडियुराप्पा यांच्या तुलनेत जास्त अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. 

येडियुराप्पा 1983 पासून शिकारपूर मतदारसंघातून निवडून येत होते. 1999 साली त्यांना काँग्रेसच्या महालिंगप्पा यांनी पराभूत केले. मात्र आज हेच महालिंगाप्पा त्यांचे निवडणूक व्यवस्थापक आहेत. येडियुराप्पा यांना तीनदा आव्हान देणारे के. शेखरप्पा हेही त्यांच्यासाठीच प्रचारात उतरले आहेत. 2013 साली काँग्रेसच्या एच. एस. शांतवीरप्पा गौडा यांनी येडियुराप्पा यांना सळो की पळो करून सोडले होते. ही निवडणूक येडियुराप्पा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची व आव्हानात्मक करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आता ते येडियुराप्पांच्या बाजूने आहेत. 2013 सालीच जनता दल धर्मनिरपेक्षतर्फे येडियुराप्पा यांच्या विरोधात लढणारे बी. डी. भूकनाथ त्यांच्याच गोटात सामील झाले आहेत. 

चामुंडेश्‍वरी विधानसभा मतदारसंघात 2006 साली झालेल्या पोटनिवडणुकीत सिद्धरामय्या यांच्या बाजूने व्ही. श्रीनिवास प्रसाद आणि एच. विश्‍वनाथ मदतीसाठी होते. आज श्रीनिवास प्रसाद भाजपात गेले आहेत तर विश्‍वनाथ यांनी जनता दल धर्मनिरपेक्षमध्ये प्रवेश केला आहे. हे महत्त्वाचे वरिष्ठ मित्र इतर पक्षामध्ये गेले असले तरी नंजनगुंड आणि गुंडलुपेट येथे झालेल्या पोटनिवडणुका सिद्धरामय्या यांनी स्वतःच्या करिष्म्यावर जिंकून  काँग्रेसला दिल्याचे सांगितले जाते. 

पण त्यांना खरे आव्हान त्यांच्या मतदारसंघात निजद उमेदवाराचे आहे. ही व्यक्ती म्हणजे त्यांचेच एकेकाळचे सहकारी जी. टी. देवेगौडा. यामुळे सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या इतर जागांवरील प्रचारापेक्षा आपल्या मतदारसंघासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आणि एकेकाळच्या विरोधकांना आपल्या काफिल्यात सामावून घेणार्‍या येडियुराप्पा यांना मतदारसंघाबाहेर जाण्यास जास्त वेळ मिळणार आहे. 

- प्रतिनिधी