Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Belgaon › आळंद मतदारसंघात आमदार पाटील यांची कसोटी  

आळंद मतदारसंघात आमदार पाटील यांची कसोटी  

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 8:55PMआळंद विधानसभा : गुरय्या रे.स्वामी

आळंद  मतदारसंघ कोणत्याही एका राजकीय पक्षाचा राहिला नाही. व्यक्तिनिष्ठ राजकारण महत्त्वाचे असून मतदार जातीय राजकारणापेक्षा तालुक्यातील राजकीय स्थितीचा अंदाज घेऊन मतदान करीत आले आहेत. यामुळे येथील मतदारांचा अंत कोणाला लागत नाही. गेल्या निवडणुकीत कर्नाटक जनता पक्षातर्फे निवडून आलेले आमदार बी. आर.पाटील काँग्रेसतर्फे तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार सुभाष गुत्तेदार निधर्मी जनता दल सोडून भाजपमध्ये आले आहेत. 11 उमेदवार रिंगणात असून 2013 मधील लढतीप्रमाणे यंदाही बी. आर. पाटील आणि गुत्तेदार यांच्यातच स्पर्धा होत आहे. 

मतदारसंघात एकूण 2 लाख 29 हजार मतदार असून त्यापैकी 1 लाख 19 हजार पुरूष तर 1 लाख 10 हजार महिला मतदार आहेत. लिंगायत बहुसंख्य आहेत.सुमारे 68 हजार 522 लिंगायत,30 हजार 857 मुस्लिम,35 हजार 839 दलित,13720 लमाणी असून 13347 कुरूब(धनगर) मतदार आहेत. 12 हजार मराठा मतदारांचा समावेश आहे. गुत्तेदार इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या इदिगा समाजाचे पाचशेही मतदार नसताना ते तीन वेळा निवडून आलेे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सदैव त्यांच्या पाठीशी असलेले बहुसंख्य दलित व मुस्लिम त्यांच्यापासून दुरावले आहेत. पाच वर्षात 1600 कोटींची विकासकामे केल्याने पाटील मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. गुत्तेदार यांच्यासाठी लढत सोपी नाही.

काँग्रेस प्रचाराची धुरा अक्‍कलकोटचे आ. सिध्दराम पाटील, औसाचे आ. बसवराज पाटील मुरूम यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष विठ्ठल पाटील, सिध्दाराम पॅटी, आर.के. पाटील, चंद्रशेखर हिरेमठ,बाबूराव पाटील, बी. के. पाटील, आदी सांभाळल आहेत. गुत्तेदार यांच्यातर्फे खासदार भगवंत खुबा यांच्या मार्गदर्शनाखाली जि. पं. सदस्य हर्षानंद गुत्तेदार, शिवपुत्रप्पा पाटील मुन्नोळी,वीरण्णा मंगाणे, संजय मिस्कीन, असिफ अन्सारी, युसुफ अन्सारी, हणमंतराया मालाजी आदी प्रचार करीत आहेत.   आतापर्यंत झालेल्या लढतीत गुत्तेदार आणि पाटील प्रत्येकी तीन वेळा निवडून आले आहेत.1994, 1999 आणि 2008 मध्ये गुत्तेदार यांनी विजय मिळवला. 1983, 2004 आणि 2013 साली झालेल्या लढतीत पाटील विजयी झाले. दोन वर्षापूर्वी गुत्तेदार यांनी भाजपात प्रवेश केल्याने कजपाचे आ. बी. आर. पाटील एकाकी पडणार की काय असे वाटत होते. मतदारसंघात अनेक विकास कामे करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. आणि मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची राजकीय स्थिती भक्कम होत गेली. या मतदार संघात संयुक्त जनता दलातर्फे निवडणूक लढवित असलेले अरूणकुमार पाटील जोरदार प्रचार करीत आहेत.