Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Belgaon › केंद्रीय सुरक्षा पथके बेळगावात दाखल

केंद्रीय सुरक्षा पथके बेळगावात दाखल

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 08 2018 10:33PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी जिल्ह्यामध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बेळगावमध्ये दाखल झाल्या आहेत. रविवारी सकाळी येथील रेल्वे स्थानकावर आलेल्या तुकड्यांना नियोजित स्थळी नेण्यात आले. यामुळे रेल्वे स्थानकावर सकाळी मोठी गर्दी झाली होती. 

राज्यामध्ये निवडणुका सुरळीतपणे पार पडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाची मदत घेण्यात येत आहे. बेळगाव येथे दिल्ली, गुजरात, छत्तीसगड राज्यांमधील सीआरपीएफ, आरपीएफ, ब्लॅक कमांडोंचा या तुकड्यांमध्ये समावेश आहे. सकाळी 10 वाजता रेल्वेमधून आलेल्या सुरक्षा दलाच्या तुकड्यांना नियोजित स्थळाकडे नेण्यासाठी ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती. 

हुबळी, धारवाडसह विविध जिल्ह्यांमध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. उमेदवारांच्या प्रचाराला यापुढे धार येणार आहे. आरोप - प्रत्यारोप रंग,णार आहेत. यातून काही अप्रिय घडल्यास सुरक्षा कुमक आवश्यक असते. यासाठी आतापासूनच सुरक्षा व्यवस्था अधिक भक्‍कम करण्याच्या उद्देशाने सुरक्षा रक्षकांना आधीच पाचारण करण्यात आले असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. आणखी काही तुकड्याही लवकरच दाखल होणार असून बेळगाव जिल्ह्यातही सुरक्षा दलाच्या रक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  जिल्ह्यात काही मतदारसंघ संवेदनशील आणि अतिसंवेदनशील आहेत. तेथे या रक्षकांना तैनात ठेवण्यात येणार आहे. यामुळे जादाची कुमक लागणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.