Sat, Jun 06, 2020 06:37होमपेज › Belgaon › कर्नाटकमध्ये अ‍ॅलर्ट

कर्नाटकमध्ये अ‍ॅलर्ट

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 11:28PMबंगळूर : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बंगळुरात विध्वंसक कृत्ये घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती गुप्‍तचर खात्याने दिली आहे. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने कर्नाटक सरकारला सतर्कतेची सूचना दिली आहे. त्यानुसार पोलिस महासंचालकांनी सर्व अधिकार्‍यांना सूचना दिली असून बंगळूरसह बेळगाव, म्हैसूर, मंगळूर तसेच ऐतिहासिक वास्तू असणार्‍या ठिकाणी काटेकोर नजर ठेवण्याची सूचना दिली आहे.

चार दिवसांपूर्वी बंगळूर आणि रामनगरात जमात उल मुजाहिद्दिन (जेइमबी) संघटनेच्या दोघा संशयित दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) अटक केली आहे. त्यांच्या चौकशीवेळी स्फोटक माहिती मिळाली आहे. देशातील अनेक राज्यांत विध्वंसक कृत्यांचा कट आखण्यात आला होता. कर्नाटकातील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात येणार होते, असे उघडकीस आले आहे. यामुळे पोलिस महासंचालक नीलमणी राजू यांनी सर्व विभागीय पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्‍त, जिल्हा पोलिसप्रमुखांना सूचना दिली आहे. 

राज्यात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नयेत, याची खबरदारी घ्यावी. बंगळुरातील चर्च स्ट्रीट, म्हैसुरातील न्यायालयात बॉम्बस्फोटानंतर दहशतवादी संघटनांच्या कारवाया थंडावल्या आहेत; पण  गाफील न राहता सर्वत्र करडी नजर ठेवण्याचे आदेश नीलमणी राजू यांनी दिले आहेत. अटकेतील संशयित दहशतवाद्यांविषयी अधिक तपास करण्यासाठी ‘एनआयए’चे पथक तामिळनाडूला रवाना झाले आहे.