होमपेज › Belgaon › शहराच्या शांततेसाठी पुढाकार कोण घेणार?

शहराच्या शांततेसाठी पुढाकार कोण घेणार?

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 11:37PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गेल्या महिनाभरात शहरात तणावाच्या पाच घटना घडल्या असून, किरकोळ कारणांवरुनही जातीय तणाव वाढीस लागला आहे. युुवाशक्तीचा दुरुपयोग करून शहराला वेठीस धरण्याचे नियोजन काही राजकीय महत्त्वाकांक्षींनी ठेवल्याचे स्पष्ट होत असून, त्यामुळे दंग्रलग्रस्त भागासह शहरवासी चिंतेत आहेत. 

विधानसभा निवडणुका तोंडावर असून जातीय तणावाला रोखण्याऐवजी मतलबी राजकारणी   जातीय तणावात आपली पोळी भाजून घेत आहेत. पोलिस आयुक्तालयाने सामान्य शहरवासियांची घोर निराशा केली आहे. अशावेळी जनतेलाच शहाराच्या शांततेसाठी आपल्यापरीने प्रयत्न करावे लागणार आहेत.

बेळगाव शहर तसे संवेदनशील आहे. 1992 साली शहरात मोठ्या प्रमाणात जातीय दंगल घडविण्यात आल्या. त्यानंतर बेळगाव शहराला जातीय दंगलीचे ग्रहण कायम लागलेले दिसते. 2012 साली निवडणुकीच्या तोंडावर शहरात जातीय दंगल झाली. या दंगलीत वडगाव येथील अरीफ माणगावकर आणि गडहिंग्लजचा तरुण डॉ. चेतन पाटील या दोन निष्पापांची हत्या करण्यात आली.त्यानंतर शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात जातीय तणावाच्या घटना वारंवार घडल्या. 

2014 अंमली पदार्थाच्या व्यवहारातून अनगोळमध्ये युवकाचा खून झाल. त्यावेळी सदर प्रकरणाला जातीय स्वरुप देण्यात आले. एका गटाने भरदिवसा शहरात उच्छाद मांडला. शंभरजणांच्या टोळक्याने रस्त्यावरील वाहनांची नासधूस करत प्रचंड दहशत निर्माण केली होती. 2015 साली अनंत चतुदर्शी मिरवणुकीनंतर जातीय तणाव निर्माण झाला. या तणावाला खतपाणी घालणार्‍या एका नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शनिवार खुटनजीकच्या कथित थडग्यावरुन जातीय तणावाचे लोण पसरले. गांधीनगर येथे क्षुल्लक कारणावरुन जातीयवादाचा भडका उडाला. 

समाजकंटकांनी खासगी बरोबरच पोलिसांची वाहने पेटविली.त्यानंतर गांधीनगरात शांतता दिसत असली तरी खडक गल्ली परिसर मात्र कायमच तणावाखाली आहे. खडक गल्ली परिसरात गेल्या महिन्याभरात पाचवेळा जातीय तणावाचा भडका उडाला. सोशल मीडियातून अफवा पसरवणे सोपे बनले आहे. काही मिनिटांत माहिती पसरवली जाते. दगड मारले जातात. 

गाड्या फुटतात, वाहने जाळली जातात आणि काही  क्षणात तणाव पसरतो. त्याचा सर्वाधिक फटका स्थानिकांना आणि व्यावसायिकांना बसतो. हिंसाचार ओसरतो न ओसरतो तोच पांढर्‍या कपड्यांतील लोक भेटी देतात. पोलिस प्रशासनाला इशारे देतात, मोर्चे काढले जातात. पण त्यामुळे दंगली थांबलेल्या नाहीत.

आयुक्तालय किती परिणमकारक?

शहरात आयुक्तालय सुरु झाल्यानंतर गुन्हेगारी कमी होईल, वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल, जातीय तणावाचे प्रमाण कमी होईल, अशी आशा व्यक्त झाली होती. 

लोकप्रतिनिधींची भूमिका काय़?

शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर संज्योत बांदेकर, ज्या मतदारसंघांत जास्त दंगली घडतात त्या उत्तर मतदारसंघाचे आमदार फिरोज सेठ आणि संवेदनशील असलेल्या दक्षिण मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील यांनी शहर शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शहरवासीयांतून व्यक्त होत आहे.