Mon, Jul 22, 2019 00:47होमपेज › Belgaon › जोयडा तालुक्यात काजू उत्पादन 60 टक्के घटले

जोयडा तालुक्यात काजू उत्पादन 60 टक्के घटले

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 12 2018 9:19PMरामनगर : वासुदेव सावंत

गेल्या काही दिवसांत वारंवार बदलणार्‍या हवामानाचा विपरित परिणाम जोयडा तालुक्यातील काजू उत्पादनावर झाल्याने काजूचे उत्पादन 60 टक्क्यांनी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
सध्या काजूचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू असून जोयडा तालुक्यातील रामनगर, शिंगरगाव, कुंभारवाडा, जोयडा, वैजगाव, असू, जगलबेट, विरझोंळ, वर्लेवाडी, प्रधानी, अवेडा भागात काजूच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षाच्या तुलनेत उत्पादनात फारच घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी अचानक वातावरणात बदल तसेच पावसाच्या सरी कोसळ्याने याचा प्रतिकूल परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. झाडांना आलेल्या मोहोराचे रुपांतर फळात होण्यासाठी जे वातावरण आवश्यक असते त्यात प्रचंड फरक जाणवला आहे. सुरुवातीच्या काळात काजू झाडांना असलेल्या बहरामुळे यंदा काजूचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता काजू उत्पादकांनी व्यक्‍त केली होती. मात्र अचानक वातावरणात बदल झाला. यामुळे पिकावर विपरित परिणाम झाला आहे. काजू उत्पादन हे या भागातील नागरिकांचे मुख्य आर्थिक स्रोत आहे. काजू उत्पादन घटल्यामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

यंदा काजू उत्पादनात बर्‍याच प्रमाणात घट झाली असून काही दिवसांपूर्वीचे ढगाळ वातावरण याला कारणीभूत आहे. मध्यंतरी दोन दिवस काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्याने याचाही विपरित परिणाम काजू उत्पानावर झाला आहे, असे शिंगरगाव येथील काजू उत्पादक व्ही. जी. देसाई यांनी सांगितले.

डोंगराळ भागातील काजू उत्पानावर हवामानाचा प्रचंड परिणाम झाला असून त्यामुळे यंदा काजूचे उत्पादन बर्‍याच प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम आर्थिक नियोजनावर होणार असून बाजारपेठेतही मंदीची झळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मोशेत येथील काजू उत्पादक रामा मिराशी यांनी  सांगितले.
गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा काजू उत्पादनावर हवामानामुळे झालेल्या परिणामातून नागरिकांसमोर अडचण होण्याची शक्यता वाडीवरील रामचंद्र देसाई यांनी व्यक्‍त केली आहे.

Tags : Cashew, production, Joyda taluka, declined ,60 percent ,belgaom news