Mon, Apr 22, 2019 03:46होमपेज › Belgaon › काजू उत्पादक हवालदिल...

काजू उत्पादक हवालदिल...

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 7:53PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव आणि खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांचा मुख्य आर्थिक स्रोत असणारा काजू हंगाम यंदा लांबला आहे. यामुळे काजू उत्पादक हवालदिल बनला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस काजू हंगाम सुरू होत असे. परंतु यावर्षी बदलत्या हंगामाचा फटका बसला असून याचा परिणाम मोहोरावर होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नसताना शेतकर्‍यांना आर्थिक आधार देण्याचे काम काजू करत असतो. यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण काजूवर अवलंबून असते. सध्या काजूला मोहोर आला आहे. मात्र लागवड सुरू झालेली नाही. यामुळे अडचणीत भर पडली आहे. यातच काही दिवसापासून धुक्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका उत्पादनाला बसला आहे.

बेळगाव तालुक्यासह खानापूर तालुक्यातील अनेक गावांचे अर्थकारण काजू पिकावर अवलंबून आहे. यामध्ये बेळवट्टी, बडस, राकसकोप, बिजगर्णी, बेळगुंदी, बाकनूर, बोकमूर, सोनोली, यळेबैल, कुद्रेमानी, बाची, तुरमुरी, कोनेवाडी, बसुर्ते, अतिवाड, बेकिनकेरे, किणये, रणकुंडये, बहादरवाडी, कर्ले, त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील जांबोटी, ओलमणी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, बैलूर, बडस, कालमनी, उचवडे, कुसमळ्ळी आदी गावांचा समावेश आहे. बदलत्या वातावरणामुळे मोहोर जळून जात आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटणार आहे.

काजू हंगामाला विलंब झाला आहे. काजू मोहोर जळून जात असून याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. कृषी विभागाने याची दखल घ्यावी.   - राजाराम राजगोळकर, शेतकरी, कुद्रेमानी

यंदा काजुचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर वाढेल का, हे आताच सांगता येणार नाही. गेल्या वर्षी 152 रुपये किलो दर होता.    - मल्लाप्पा जांबोटकर, काजूफॅक्टरी संचालक