Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Belgaon › अधिकार्‍यांना काळजी स्वतःच्या आरोग्याची

अधिकार्‍यांना काळजी स्वतःच्या आरोग्याची

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 08 2018 8:46PMबेळगाव : प्रतिनिधी

प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे तसा निवडणूक अधिकार्‍यांसह पोलिस प्रशासनावरील ताण वाढत आहे. कामाच्या तणावामुळे, धावपळीमुळे जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे, अशा तक्रारी अधिकारी खासगीत मांडत आहेत. तथापि, कितीही व्यस्त असलात तरी आरोग्य आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. 
निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत एकाही कर्मचार्‍याला रजा मिळत नाही. पोलिसांना निवडणूक म्हणजे अक्षरशः डोकेदुखी ठरली आहे. यामुळे निवडणुक होईपर्यंत कामाचा भार कमी होणार नसल्याची खंतही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अधिकारी व कर्मचारी सतत महिनाभरापासून निवडणूक कामात व्यस्त असतात. कामाने आलेला मानसिक थकवा घालविण्यासाठी चहा अतिप्रमाणात घेतला जातो. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दिवसातून दोन वेळाच चहा घेणे योग्य आहे. नाश्ता म्हणून कचोरी, भजी, वडापाव या पदार्थांना प्राधान्य दिले जाते. ते तेलकट असल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. 
सध्या कडक उन्हाळा सुरु असल्याने उन्हाळ्यात हलका आहार घेण्यास प्राधान्य देणे हितकारक आहे. जेवणात तिखट, आंबट, खारट पदार्थांचे प्रमाण कमी असावे. शक्य असल्यास ते घेण्यास टाळावे. भात, पोळी, भाकरी, मुगाची डाळ असा सहज पचणारा आहार घ्यावा. चहाऐवजी लिंबू सरबत, ताक, लस्सी, ज्यूस, नारळपाणी यांना प्राधान्य द्यावे.  निवडणुकीचे काम करताना उन्हामध्ये जास्त फिरावे लागते. त्यामुळे तेलकट पदार्थ खाणे टाळावे. 

तसेच भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. बर्फाशिवाय लिंबू सरबत, उसाचा रस घेणे आवश्यक कोंल्ड्रिंक्स शक्यतो टाळावे. प्रचाराला बाहेर पडताना किंवा निवडणूक कामासाठी बाहेर पडलेल्या अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांनी खडीसाखर, गुळ, आवळा सुपारी, इलेक्ट्रॉल पावडर जवळ ठेवणे गरजेचे आहे. निवडणूक अधिकारी म्हणून शिक्षकांची नेमणुक केली जाते. त्यांना इतर जिल्ह्यात इलेक्शन ड्यूटीसाठी जावे लागते. मतदान प्रक्रिया सकाळी 7 ते रात्री 6 पर्यंत असल्याने  अधिकार्‍यांना लांबच्या ठिकाणी रात्रीच वस्तीला जावे लागणार आहे. यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.