Sun, Mar 24, 2019 11:03होमपेज › Belgaon › कार जाळणारा निघाला डॉक्टर

कार जाळणारा निघाला डॉक्टर

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 19 2018 12:44AMबेळगाव : प्रतिनिधी

दोन दिवसांत शहरात 11 अलिशान कार पेटवणारी व्यक्‍ती चक्‍क डॉक्टर आहे. शिवाय बिम्स या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापकही आहे. डॉ. अमित विजयकुमार गायकवाड (वय 37, मूळ प्रगतीनगर, गुलबर्गा, सध्या रा. सदाशिवनगर, बेळगाव) असे त्याचे नाव असून, त्याला अटक झाली आहे.जाधवनगर, विनायकनगर, शरकत पार्क या परिसरात मंगळवारी व बुधवारी रात्री 11 कार पेटवण्यात आल्या होत्या. जाधवनगरमध्ये कार पेटवणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला होता. त्या आधारे एपीएमसी पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी बुधवारी मध्यरात्री संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीअंती तो संशयित म्हणजे बिम्सचा प्राध्यापक निघाला.  डॉ. अमितने गेल्या चार दिवसांत बेळगावात 11 तर गुलबर्गा येथे 8 वाहने जाळल्याची  कबुली दिली.

बिनक्रमांकाच्या कारचा वापर

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही चित्रणानुसार बिनक्रमांकाच्या कारमधून डॉ. अमित हेल्मेट घालून येतो, हेल्मेट घालूनच कारमधून उतरतो आणि सोबत आणलेल्या कॅनमधले डिझेल कारवर ओततो आणि पेटवून देतो. चौकशी सुरू केल्यानंतर तो सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. अमितने गुलबर्गा या आपल्या मूळ गावी मकर संक्रांतीला गेला असताना 8 कार जाळल्याची कबुली दिली.

अटकेनंतर अमितला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला 29 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली. त्यानुसार त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

घरी डिझेल, स्पिरीट कॅन

पोलिसांनी अमितच्या सदाशिवनगर घराची झडती घेऊन स्पिरीटच्या बाटल्या, डिझेलचे कॅन, कापडाचे बोळे, इंजिन ऑईल, लोखंडी सळ्या, लायटर, कापराच्या डब्या, दोर्‍याचे गोळे, दोन चाकू, पाच मोबाईल व त्याची कार जप्त केली. त्यानंतर त्याला अटक झाली. तसेच अमितच्या गुन्ह्यांची माहिती बिम्स प्रशासनाला दिली.

मानसिक संतुलन बिघडले?

अमित गायकवाडच्या कृत्यांची माहिती पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी पत्रकारांना दिली. तर बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ.एस. टी. कळसद यांनी अमितची मानसिक स्थिती काही दिवसांपासून ठीक नसल्यामुळे  त्याला एक महिन्याच्या सक्‍तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते, असे सांगितले.