Tue, Jul 07, 2020 23:10होमपेज › Belgaon › पीजी नीट परीक्षेसाठी उमेदवार  महाराष्ट्राचाच रहिवासी असावा

पीजी नीट परीक्षेसाठी उमेदवार  महाराष्ट्राचाच रहिवासी असावा

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 10:33PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

2018 मध्ये होणार्‍या पीजी नीट परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्याने प्रवेश प्रक्रिया बदलली आहे. त्या प्रक्रियेनुसार विद्यार्थी हा महाराष्ट्राचाच रहिवासी असणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे सीमाभागातील 865 खेड्यांमधील मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यासाठी ही जाचक अट महाराष्ट्र सरकारने शिथिल करावी, अशी मागणी सीमाभागातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे.

या निर्णयामुळे सीमाभागातील महाराष्ट्रात एमबीबीएस व बीडीएसचे शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना पीजी नीट परीक्षा देता येणार नाही. यासाठी ती अट तातडीने रद्द करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना सीमाभागातील 865 खेड्यांतील मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचेच रहिवासी असल्याचे ग्राह्य धरून त्यांना सोयी सवलती दिल्या जातील, असे घोषित केलेले आहे; परंतु अलीकडेच महाराष्ट्र सरकारने पात्रता प्रक्रिया बदलल्याने सीमाभागातील विद्यार्थ्यांना एमडी व एमएसचे महाराष्ट्रातून शिक्षण घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ निर्माण झालेली आहे.

सीमाभागातील कोट्यातून महाराष्ट्रात प्रवेश घेऊन वैद्यकीय पदवी घेतलेल्या 10 विद्यार्थ्यांना दरवर्षी पदव्युत्तर शिक्षणासाठी पात्रता प्रक्रियामधून महाराष्ट्राचाच रहिवासी असला पाहिजे, ही अट शिथिल करावी, अशी मागणी सीमाभागातील मराठी जनतेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.