Sat, Mar 23, 2019 16:39होमपेज › Belgaon › उमेदवारांना एक लाखाची खर्च मर्यादा

उमेदवारांना एक लाखाची खर्च मर्यादा

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 8:27PMखानापूर : प्रतिनिधी

नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना आदर्श आचारसंहितेनुसार खर्चाची मर्यादाही घालण्यात आली आहे. निवडणूक प्रचार, जाहिरातबाजी, पत्रके, होर्डींग्ज, किरकोळ खर्च आदींसाठी कमाल एक लाख रु.पर्यंतच खर्च करता येणार आहे. याशिवाय रोजच्या खर्चाचा तपशील निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करावा लागणार आहे.

उमेदवारांच्या वारेमाप खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक अधिकार्‍यांसोबत खर्च तपासनीस आणि लेखा अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर ठेवली जात होती. मात्र सर्वच निवडणुकांमध्ये पैशाचा जनमत बदलासाठी वापर होत असल्याचे आढळून येत असल्याने नगरपंचायत निवडणुकीत उभे राहणार्‍या उमेदवारांनाही खर्च मर्यादा लागू करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या स्वरुपावरुन उमेदवारांचा अपेक्षित खर्च अंदाजे धरून खर्च मर्यादा लागू केली गेली आहे.  न. पं.च्या रिंगणात उभे ठाकणार्‍यांना एक लाख रु.पर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. वृत्तपत्रांना देण्यात येणार्‍या जाहिराती, होर्डिंग्ज यासंदर्भातील प्रसिद्धीपूर्वी संबंधित निवडणूक अधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ समाजसेवेचे व्यासपीठ म्हणूनच नव्हे तर प्रतिष्ठेच्या दृष्टीनेही नगरपंचायतीमध्ये निवडून जाणे हे अनेकांसाठी महत्त्वाचे बनल्याने निवडून येण्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे खर्च करण्याची तयारी दर्शविण्यात येते. मटण-मद्याच्या जेवणावळी, पैशांचे वाटप, वस्तू व आकर्षक भेटवस्तूंची आमिषे देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे गल्लीच्या राजकारणात ‘एम पॉवर’चा वापर करुन जनमताला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

खोट्या प्रतिष्ठेपायी पैशाची वारेमाप उधळपट्टी आणि त्यायोगे अपात्र उमेदवार निवडून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. निवडणुकीतील या अवैध प्रकारांना अनियंत्रित आणि बेबंद खर्च करणार्‍यांची क्षमता हेदेखील प्रमुख कारण असल्याने खर्चावरील नियंत्रण आवश्यक बनले होते. शिवाय उमेदवारांकडून निवडणूक अधिकार्‍यांना अंधारात ठेवून जेवणावळी आणि ओल्या पार्ट्या देणेही महागात पडणार आहे. हा खर्चदेखील उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये सामील केला जाणार आहे.निवडणूक विभागाच्या या नव्या नियमांमुळे उमेदवारांचा मात्र हिरमोड झाला असून रोजच्या खर्चाचा तपशील ठेवण्यासाठी वाणिज्य शाखेतील पदवीधर कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागणार आहे.