होमपेज › Belgaon › उमेदवार थेट मतदारांच्या कानाशी

उमेदवार थेट मतदारांच्या कानाशी

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:46AMबेळगाव : प्रतिनिधी

अर्ज भरणा, अर्ज छाननी, माघारी हा महत्वाचा टप्पा अद्याप शिल्लक असताना विधानसभेच्या उमेदवारांनी सोशल मिडियावर प्रचाराचा नारळ फोडला आहे. चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच सोशल मिडीया वॉरला धार आली आहे. स्वतःची चांगली प्रतिमा मतदारांसमोर आणण्याचे काम उमेदवारांकडून केले जात आहे. 

कर्नाटकात विधानसभेची निवडणूक 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. राज्यात सध्या काँग्रेसची सत्ता असली तरी 2018 ची निवडणूक त्रिशंकू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराने सोशल मिडीयावरून आधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. बेळगाव जिल्ह्यात ग्रामीण, उत्तर, दक्षिण, यमकनमर्डी, गोकाक, अथणी, रायबाग, निपाणी, खानापूर, कागवाड, सदलगा आदी 18 मतदारसंघ आहेत. यामधून काँग्रेस, भाजप, जेडीएस, समिती पक्ष रिंगणात उतरले आहेत. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाचा संदर्भ देत मनाला भिडणारी वाक्यरचना लिहून मतदारांपर्यंत पोचविली जात आहेत. सोशल मिडीयावरून सुरु असलेला हा प्रचार मनात रुपांतरीत होईल की नाही याबाबत साशंकता असली तरी इच्छुक उमेदवार मात्र चर्चेत आले आहेत. वेबसाईट, मेल, ट्विटर, फेसबूक, मोबाईल, एसएमएस, यु-ट्यूब, व्हॉट्सअपचा वापर प्रचारासाठी वाढल्याने यंदाच्या निवडणुकीला वेगळेच स्वरुप प्राप्त झाले आहे.

व्हॉट्स अप व फेसबुकच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहे. व्हॉट्स अ‍ॅपची इमेज बनवून देणार्‍या डिझायनरची या निवडणूकीने दिवाळी केली आहे. यासाठी त्यांना पाच ते दहा हजारांचे पॅकेज मिळत असल्याची माहिती मिळाली. 

कशा स्वरुपाचा असतो हा कॉल

मतदाराच्या मोबाइलवर संबंधित उमेदवाराच्या नावाने कॉल येतो. कॉल घेतल्यानंतर उमेदवाराच्या आवाजातील संभाषण ऐकू येते. ते असे असते ः  ‘नमस्कार... मी या पक्षाचा उमेदवार. मी या मतदार संघातून निवडणूक लढवीत असून माझ्या नावाच्या चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड मताने विजयी करून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद!‘ मतदाराला वाटते की थेट उमेदवारच आपल्याशी बोलतोय. पण खरे तर रेकॉर्डेड कॉल असतो. पण त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

थेट कानाशी

सध्या काही राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी नामी युक्‍ती शोधून काढली आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या अगोदरच उमेदवारांनी मोबाईलच्या माध्यमातून प्रचाराचा वेग घेतला आहे. अशा या प्राचाराला आचारसंहितेचे बंधन असणार का ? तसेच याला वेळेच बंधन असणार का ? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.
 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka Assembly Elections, social media, Campaigning,