Thu, Apr 25, 2019 21:35होमपेज › Belgaon › खादी ग्रामोद्योग अधिकारी योगेश शर्मा यांची माहिती

भ्रष्टाचाराची दाद मागा ऑनलाईन

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:10AMबेळगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या सर्व योजना एनजीओंमार्फत राबविण्यात येतात. यात भ्रष्टाचार झाल्यास ऑनलाईन  तक्रार दाखल करता येते, अशी माहिती खादी ग्रामोद्योगाचे अधिकारी योगेश शर्मा यांनी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीला दिली.

खानापुरातील केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरण ‘पुढारी’ने उघडकीस आणले. यानंतर घोटगाळीतील 20 जणांना इलेक्ट्रिक व्हीलचे वाटप करण्यात आले. तसेच 20 जणांचे प्रत्येकी दोन हजार रुपये परत दिले. या संस्थेसंबंधीची तक्रार ऑनलाईन करता येते, असे शर्मा यांनी तेथील ग्रामस्थांना दिल्याची माहिती लाभधारकांनी दिली.  

भ्रष्टाचार होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या सर्व योजना एनजीओमार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणत्याही योजनेचा परिपूर्ण अभ्यास न करता केवळ अधिकारी देत असलेल्या माहितीच्या आधारे लोक योजनांचा लाभ मिळवतात. यासाठी लाच म्हणून पैसेही देतात. लाभ मिळाला नाही तर तक्रार करण्यासाठी पुढे सरसावतात.  सर्व योजना ऑनलाईन झाल्याने लाचखोर अधिकार्‍यांची  गोची झाली आहे. कारण सर्व योजना  कार्यालयामार्फत न राबविता त्या एनजीओ अथवा मान्यताप्राप्त सहकारी संस्था, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येतात. यामुळे योजना राबविण्यासाठी येणारी रक्कम थेट लाभधारकाच्या खात्यात जमा होते. 

यातून अधिकारीवर्गाने नामी शक्कल लढवली. थेट एनजीओ, सहकारी संस्था, संघ यांच्याकडून दहा टक्के  रक्कम देण्याचे ठरवून योजना राबविण्यात येत आहेत. खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर अधिकारी रोख रक्कम घेणे पसंत करतात. चेक अथवा डीडी स्वीकारत नाहीत. चौकशीचा ससेमिरा लागला तर तो योजना राबविलेल्या एनजीओच्या मागे लागतो. आर्थिक व्यवहार फिसकटले तर प्रकरण चव्हाट्यावर येते. तोपर्यंत सार्‍यांची चुप्पी असते. दहा  टक्के रक्कम आगवू हातात दिली तरच योजनेला चालना मिळते. 

खानापूरच्या केंद्रीय ग्राम कुम्हारी संस्थेत विविध एनजीओंमार्फत योजना राबविल्या आहेत. खानापूर, बेळगाव, गोकाक, हुबळी, मंगळूर, बिदर, असू, घोटगाळी, सिंगिनकोप या गावात राबविलेल्या योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यासंदर्भात आरटीआय अंतर्गत माहिती मिळाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. भ्रष्टाचारविरोधात कुणीही थेट तक्रार करण्यास पुढे धजावत नाही. कारण त्यांचे आर्थिक व्यवहार त्या अधिकार्‍याशी अडकलेले असतात. यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.