Mon, Aug 19, 2019 07:05होमपेज › Belgaon › मतदानानंतर आता आकडेमोड

मतदानानंतर आता आकडेमोड

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 13 2018 11:55PMनिपाणी : प्रतिनिधी

शनिवारी सर्वत्र चुरशीने व ईर्षेने मतदान झाले. निपाणी मतदारसंघात 10 उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेसचे माजी आ. काकासाहेब पाटील व भाजपच्या आ. शशिकला जोल्ले यांच्यातच आहे. गावागावात राजकीय गटाच्या प्रमुख नेतेमंडळींसह उमेदवारांची मतदानाची आकडेमोड सुरू झाली आहे.

15 रोजी  बेळगावात मतमोजणी  होणार असून सर्वांनाच पुढच्या हिशेबाची धास्ती लागून राहिली आहे. आकडेमोड, गोळाबेरीज सुरू झाली आहे. केवळ आठ-दहा दिवसात  दोन्हीही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींनी   प्रचाराला सुरूवात केली. काँग्रेसतर्फे महाराष्ट्रासह कर्नाटकातील दिग्गज नेत्यांनी सहभाग दर्शविला. भाजपतर्फे दिग्गज प्रत्यक्षात प्रचारात दिसले नाहीत. मतदानाच्या आधी दोन दिवस मोठी ईर्षा झाली. जाईल तिकडे एकेका मतासाठी ठरवलेले दर कानावर आले. शुक्रवारी रात्री तर बाजूकडून मतदारांनी हात धुवून घेतले. शनिवारी हक्काचे मतदान केले खरे. पण निकाल उद्या दिसेेल..

प्रत्येक उमेदवार व त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून एकमेकाविरोधात  करडी नजर ठेवली होती. मतदानानंतर आता बेरीज व वजाबाकीचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत आपलाच उमेदवार विजयी  होण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत कार्यकर्ते झटत होते. निपाणी मतदारसंघासाठी कारदगासह परिसरात सरासरी 85 टक्के मतदान झाले. तुरळक बाचाबाची वगळता प्रक्रिया सुरळीत पार पडली.

कारदग्यात 85 टक्के, ढोणेवाडीत 90, चाँदशिरदवाड, कुन्‍नूरमध्ये 89, भोज 84, बारवाड आणि मांगूर येथे 88, गजबरवाडीत 95, कसनाळला 92 टक्के मतदान झाले. यंदा मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानाचा कोणत्या पक्षाला लाभ होणार, हे 15 रोजी स्पष्ट होणार आहे.

बेडकीहाळमध्ये 82 टक्के मतदान पार पडले. 7718 पैकी 6353 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.गळतगासह परिसरात चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

वृध्दांनीही मतदानाचा हक्‍क बजावला. गळतगा येथे 9708 पैकी 7914 मतदारांनी हक्‍क बजावला. या ठिकाणी 81 टक्के मतदान झाले. भीमापूरवाडीत 931 पैकी 801 मतदारांनी मतदान केले. याठिकाणी 85 टक्के मतदान झाले.