होमपेज › Belgaon › कर्नाटक खातेवाटप : ‘अर्थ’ निजद, ‘गृह’ काँग्रेस

कर्नाटक खातेवाटप : ‘अर्थ’ निजद, ‘गृह’ काँग्रेस

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: Jun 01 2018 1:43AMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस-निजदमध्ये सुरू असलेला खातेवाटपातील गोंधळ दूर झाला असून शुक्रवार दि. 1 रोजी सायंकाळपर्यंत मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख निश्‍चित केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. अर्थखाते निजदला, तर गृहखाते काँग्रेसला देण्याबाबत सहमती झाली आहे.

विदेश दौर्‍यावर असणारे अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी मध्यरात्री नवी दिल्‍लीत परतणार आहेत. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्नाटकातील मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली. शनिवारी अंतिम रूपरेषा ठरणार आहे. त्यामुळे रविवारी किंवा सोमवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी शक्य आहे. काही वजनदार खात्यांबाबत निजद आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच होती. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद आणि इतर नेत्यांशी गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

गुरूवारी काँग्रेस विधिमंडळ नेते सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी काँग्रेस वरिष्ठ के. सी. वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी खातेवाटप निश्‍चित झाले. आता राहुल गांधींसमोर त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यानंतर निजद आणि काँग्रेस नेते आपापल्या पक्षातील मंत्र्यांची यादी जाहीर करतील. एकूण 30 मंत्र्यांना खातेवाटप निश्‍चित होईल. अर्थ, सार्वजनिक बांधकाम, महसूल, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, धर्मादाय, पशुसंगोपन खाते निजदला देण्यास काँग्रेसने होकार दिला आहे. त्याचप्रमाणे गृह, अबकारी, ऊर्जा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, नगरविकास, खाण आणि भू विज्ञान, उच्च शिक्षण, सहकार खाते काँग्रेसला देण्याबाबत निजदने होकार दिल्याचे समजते.