होमपेज › Belgaon › मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा कसरत

मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा कसरत

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 17 2018 12:12AMबंगळूर : प्रतिनिधी

मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळ-प्राधिकरणांवर नियुक्त्या, पक्षातील अंतर्गत गटबाजी यासह विविध विषयांसंबंधी चर्चा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील नेते बुधवारी दिल्‍लीला जाणार आहेत. 

आघाडी सरकारमधील समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर, केपीसीसी अध्यक्ष दिनेश गुंडुराव दिल्‍लीला जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. मंत्रिपदासाठी सध्या पक्षामध्ये गटबाजी सुरू आहे. विधान परिषद सभापतिपद, ज्येष्ठ नेत्यांना डावलून प्रथमच निवडून आलेल्या जयमाला यांना सभागृह नेतेपद देण्यात आले. याविषयी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यात येणार आहे. विधान परिषदेतील एका ज्येष्ठ नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना सभागृह नेतेपद देण्याबाबत याआधीच काहीजणांनी मागणी केली आहे. 

विधान परिषदेत सभागृह नेत्याच्या निवडीचा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही सभागृहात या पदाला मोठे महत्त्व असते. मुख्यमंत्र्यांच्या पदाशी समान महत्त्व या पदाला आहे. विरोधी नेत्यांचा शाद्बिक हल्‍ला परतवून लावण्याचे ज्ञान, कायद्याचे ज्ञान असणार्‍यांनाच हे पद सोपवावे लागते. जयमाला यांच्याकडे तसा कोणताच अनुभव नसल्याचे दोन्ही पक्षातील नेते मान्य करतात. याच कारणामुळे जयमाला यांच्या विरोधात व्ही. एस. उग्रप्पा, माजी मंत्री एच. एम. रेवण्णा आदी अनुभवी नेत्यांनी स्वाक्षरी आंदोलन सुरू केले आहे. 

राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याच सर्व कारणांमुळे प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्यावर तोडगा काढणार आहेत. कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची शक्यता असल्याने त्वरित मंत्रिमंडळ विस्तार करावा. प्रत्येक मंत्र्याकडे एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी ते करणार आहेत. 

कुमारस्वामीही दिल्‍लीत

18 रोजी काँग्रेस नेते दिल्‍लीला जाणार असल्याची चर्चा आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिल्‍ली येथे कर्नाटकातील खासदारांची बैठक बोलाविली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने त्यांनी ही बैठक बोलाविल्याचे समजते. गतवेळी काँग्रेस नेते दिल्‍लीला गेल्यानंतर त्याच काळात कुमारस्वामींनी राहुल यांची भेट घेतली होती.