होमपेज › Belgaon › मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी

मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 11:19PMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस आणि निजददरम्यान चर्चेच्या अनेक फेर्‍यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या बुधवारी, 6 जून रोजी करण्याचे निश्‍चित झाले आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधीही त्या दिवशीच होईल. 

अर्थ आणि गृहखाते कोणत्या पक्षाकडे ठेवायचे, यावरून काँग्रेस आणि निजदमध्ये मतभेद होते. गुुरुवारी रात्री ते मतभेद मिटल्यानंतर अर्थखाते निजदकडे तर गृहखाते काँग्रेसला देण्यावर शिक्‍कामोर्तब झाले. त्यानंतर शुक्रवारी दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी 6 जून ही तारीख निश्‍चित करण्यात आली. कर्नाटकाचे काँग्रेस प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. 

नव्या सरकारचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी एक समन्वय समितीही स्थापन करण्यात येईल. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या समितीचे प्रमुख असतील. प्रत्येक महिन्याला किमान एकदा या समितीची बैठक होऊन सरकारचे कामकाज पारदर्शक पद्धतीने होते की नाही? याचा आढावा घेतला जाईल, अशी माहितीही वेणुगोपाल यांनी दिली. 

युती सरकार 23 मे रोजी अस्तित्वात आले. तेव्हापासूनच दोन्ही पक्षांमध्ये खाते वाटपावरून रस्सीखेच सुरू होती. आता झालेल्या समझोत्यानुसार काँग्रेसला गृह, पाटबंधारे, बंगळूर शहर विकास, महसूल, नगरविकास, ग्रामीण विकास, कायदा, कृषी, मजूर, आरोग्य, गृहनिर्माण, भू-गर्भ आणि खाणकाम, महिला व बालकल्याण, अल्पसंख्यांक, क्रीडा व युवजन, वैद्यकीय शिक्षण आणि समाज कल्याण ही खाते मिळतील. तर निजदला अर्थ, अबकारी, माहिती व प्रसारण, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, सहकार, वैद्यकीय शिक्षण वगळून इतर शिक्षण, पर्यटन, पशुसंगोपन, मत्स्योद्योग, रेशीम व फळबागायती, लघुद्योग विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, नियोजन आणि सांख्यिकी, राज्य गुप्तचर विभाग आणि लघुपाटबंधारे ही खाती मिळतील.

उर्वरित खाती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांच्या सल्ल्याने कोणाकडे ठेवायची यावर निर्णय घेतील, अशी माहिती देण्यात आली. दोन्ही पक्षांमध्ये झालेले खाते वाटप अंतिम आहे. मात्र एखादा संभाव्य मंत्री बदलायचा झाल्यास त्याचा निर्णय संबंधित पक्षाने घ्यायचा आहे, असेही वेणुगोपाल म्हणाले. 

शपथविधी 2 वाजता

येत्या बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करून शपथविधी दुपारी 2 वा. होईल, अशी माहिती शुक्रवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर यांनी दिली.  बंगळूरमध्ये आयोजित संयुक्‍त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, खाते वाटपावर मतैक्य झाल्यानंतर आता शपथविधीचा दिवस आणि वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. तथापि, बुधवारी किती मंत्री शपथ घेणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळात एकूण 34 मंत्री राहू शकतात. त्यापैकी काँग्रेसला 22 तर निजदला 12 मंत्रिपदे मिळणार आहेत. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर खाते वाटप कोणाला कोणते खाते द्यायचे हा निर्णय होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.