Wed, Jul 24, 2019 12:03होमपेज › Belgaon › सीईटीला ६ महिने होऊनही शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष

सीईटीला ६ महिने होऊनही शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 28 2018 8:14PMनिपाणी : प्रतिनिधी

राज्यात हजारो शिक्षकांच्या जागा रिक्‍त असताना भरती प्रक्रियेकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये असणारी शिक्षकांची कमतरता भरुन काढण्यासाठी सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गासाठी ऑक्टोबर 2017 महिन्यात सीईटी घेण्यात आली. 10 हजार जागांसाठी झालेल्या या परीक्षेला सुमारे 60 हजार टीईटी पात्र उमेदवार बसले होते.

सीईटी होऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. पण अद्याप परीक्षेचा निकाल आणि भरती प्रक्रियेकडे दुर्लक्षच झाले आहे. 2018 सालच्या शैक्षणिक वर्षारंभी नूतन शिक्षकांची नेमणूक होईल, असे बोलले जात होते. पण वर्षारंभास सुरुवात झाली तरी भरतीकडे दुर्लक्षच दिसून येत आहे. 

टीईटी पात्र 10 हजार पदवीधर शिक्षकांच्या भरतीसाठी 26 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर याकाळात अर्ज मागविण्यात आले होते. सदर जागांसाठी 11 व 12 नोव्हेंबर, 18 व 19 नोव्हेंबर 25 व 26 नोव्हेंबर आणि 9 व 10 डिसेंबर रोजी विषयानुसार सीईटी पार पडली. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होण्यापूर्वी सहा महिन्याच्या कालावधीत नियुक्‍ती पत्र देणे आवश्यक होते. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.

पदवीधर शिक्षकांना बढतीची गरज

शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार आणि विषयानुरुप रिक्‍त असलेल्या शिक्षकांच्या जागी अतिथी शिक्षक भरती करण्यात येतात. पण शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर अतिथी शिक्षकांची नेमणूक होण्यास किमान महिन्याच्या कालावधी लोटतो. तोपर्यंत सध्या कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्‍त भार पडणार आहे. सध्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांना बढती देऊन उच्च प्राथमिक वर्गासाठी नियुक्‍ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

संबंधित विषयातील शिक्षकांच्या ज्ञानानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाल्यास गुणवत्ता आपोआप सुधारते. पण संबंधित विषयानुरुप शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळण्यास सरकारी शाळांमध्ये अडचणी येत आहेत. त्यासाठी त्वरित निकाल जाहीर करुन  शिक्षकांची भरती करण्याची मागणी होत आहे.

सध्या हजारो डी. एड्., बी. एड्. धारक पदव्या घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. शासन भरती प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक टीईटी पात्र उमेदवार बेरोजगार आहेत. त्यासाठी शासनाने रिक्‍त जागा त्वरित भरण्याची मागणीही डी. एड्., बी. एड्. धारकांतून होत आहे.