Sat, May 25, 2019 23:01होमपेज › Belgaon › सीमांवरील चेकपोस्टवर तिसरा डोळा

सीमांवरील चेकपोस्टवर तिसरा डोळा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रथमच सर्व ठिकाणी सीमा चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. झियाउल्ला यांच्या आदेशानुसार निवडणूक यंत्रणेने परराज्याच्या सीमेवरील चेकपोस्टवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत केली आहे. यापूर्वी फक्त परराज्यांच्या सीमेवरील आंतरराज्य महामार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असायची. ग्रामीण भागातील महाराष्ट्र व गोवा राज्यातून कर्नाटकात येणार्‍या लहानसहान रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव होता.

मात्र गेल्या काही दिवसात नव्याने निर्माण केलेल्या चेकपोस्टवर लाखो रुपये जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये दारूचे प्रमाण अधिक आहे. बेळगाव जिल्ह्याची बहुतांश सीमा ही महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, जिल्ह्याला लागून आहे. खानापूर तालुक्याला लागून गोवा राज्य मार्ग आहे. या ठिकाणाहून गोवा बनावटची दारू वर्षभर चोरट्या मार्गाने आणण्यात येते. सध्या निवडणूक कालावधीत असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. 

हलगर्जीपणा झाल्यास निलंबन

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. याबाबत प्रशासन सतर्क आहे. प्रत्येक ठिकाणची लहानसहान माहिती तातडीने जिल्हा केंद्राला पुरविण्याचे आदेश अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना देण्यात आले आहेत. हलगर्जीपणा झाल्यास निलंबन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. झियाउल्ला यांनी दिला आहे.

बेळगावात चौकाचौकांत नवे कॅमेरे

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त व अनुचित घटनांनवर नजर ठेवण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. नेहमीच  नागरिकांची गर्दी असणार्‍या खडेबाजार  परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

अतिसंवेदनशील भागावर नजर ठेवण्यास मदत होईल व कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होईल, यादृष्टीने हे कॅमेरे बसविण्यात येत आहेत. खडेबाजार, जालगार गल्‍ली, भेंडी बाजार चौक, गणपत गल्‍ली, खंजर गल्‍ली चौक आदी ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येत आहे. लहानसहान घटनाही या कॅमेर्‍यात कैद होतात. तसेच केवळ एकाच दिशेचे चित्रीकरण न होता चारही बाजूने चित्रीकरण होणार आहे. यामध्ये असलेल्या विशेष कार्यप्रणालीमुळे अनेक लहानसहान घटनांवर नजर ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलिस खात्यातील अधिकार्‍यांडून सांगण्यात आले. 

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka assembly elections, CCTV camera,


  •