Sun, May 19, 2019 14:07
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › न्यायालयात गेला तरी रस्ता होणारच

न्यायालयात गेला तरी रस्ता होणारच

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:32AMबेळगाव : प्रतिनिधी

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्याला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना टाळण्याचा प्रयत्न केला. रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन टाळण्यासाठी कोणत्याही न्यायालयात गेलात तरी रस्ता होणारच, अशी दर्पोक्ती केली. यामुळे शेतकर्‍यांतून संताप व्यक्त करण्यात आला.

बायपास रस्त्यामुळे वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, येळ्ळूर, मच्छे भागातील शेतकर्‍यांची शेकडो एकर शेती संपादित करण्यात येणार आहे. पिकावू जमीन रस्त्यासाठी संपादित करण्यात येणार असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यामुळे हा रस्ता थांबविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटना व शेती बचाव संघटनेकडून करण्यात येत आहे. यामुळे उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांनी कार्यक्रम स्थळी चार वाजल्यापासूनच हजेरी लावली होती.

खा. सुरेश अंगडी यांनी मंत्री गडकरी यांची भेट घडवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शेतकरी सुवर्णविधानसौधमध्ये ताटकळत बसले होते. मात्र गडकरी यांना पावसामुळे घटनास्थळी येण्यास तब्बल दोन तास उशीर झाला. त्यानंतर त्यांनी उद्घाटन कार्यक्रम उरकला. 

शेतकर्‍यांची भेट टाळण्याचा प्रयत्न संयोजकांकडून सुरू होता. याची कुणकुण शेतकर्‍यांना लागताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गडकरी यांची भेट घेण्याचा प्रयत्न चालविला. कार्यक्रम संपल्यानंतर गेटमध्ये शेतकरी नेत्यांनी गडकरींना निवेदन दिले. शेतकर्‍यांनी भूसंपादनाविरोधात उच्च न्यायालयात दावा असल्याची माहिती दिली. यावर त्यांनी भूसंपादन थांबविण्यासाठी न्यायालयात गेला तरी रस्ता होणारच अशी संतापजनक भूमिका घेतली. 

यामुळे शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. यावेळी राजू मरवे, बाळाराम पोटे, सुजित मुळगुंद, नारायण सावंत आदींसह शेतकरी उपस्थित होते.