होमपेज › Belgaon › 15 ऑगस्टपर्यंत चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्याची संगाप्पगोळ यांची मागणी 

..तर पुन्हा जिल्हानिर्मिती आंदोलन

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 11:55PMबेळगाव  : प्रतिनिधी

चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी योग्य वेळ आली असून एआयसीसी सचिव सतीश जारकीहोळी व खासदार प्रकाश हुक्केरींनी मुख्यमंत्र्यांना अधिवेशनात जिल्ह्याची घोषणा करण्यास भाग पाडावे. येत्या 15 ऑगस्टच्या आत जिल्ह्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करुन घ्यावी. अन्यथा पुन्हा जिल्हा निर्मिती आंदोलन समितीकडून आंदोलन छेडणार असल्याचा अशारा ज्येष्ठ नेते बी.आर.संगाप्पगोळ यांनी दिला.

विश्रामगृहात शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, चिकोडी जिल्ह्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. अलिकडे मंत्री रमेश जारकीहोळी व आ. सतीश जारकीहोळींनी चिकोडी व गोकाक जिल्हानिर्मितीसाठी सूचक वक्तव्य केले आहे. 

बैलहोंगलसह जिल्ह्यातील कोणाचाही चिकोडी जिल्ह्यासाठी विरोध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. सतीश जारीहोळींनी खा. प्रकाश हुक्केरींना सोबत घेऊन चिकोडी जिल्हा करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून आश्‍वासन घ्यावे. 15 ऑगस्टपर्यंत  जिल्ह्याची घोषणा करुन घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

हिरण्यकेशी नदीच्या पाण्याने चिकोडी व हुक्केरी तालुक्यातील 22 तलाव भरणी योजनेसाठी आपण 1982 पासून लढा देत आहे. दोन दिवसांपूर्वी या योजनेला चालना आ. उमेश कत्तींनी दिली. पण  योजनेसाठी लढलेल्या नेत्यांचा त्यांना विसर पडला. सदर योजना आपल्यामुळे झाल्याचे सांगून दिशाभूल करीत असल्याचा आरोप संगाप्पगोळ यांनी केला. मागील 40 वर्षात  या योजनेसह करगांव पाणी पुरवठा योजना का राबविली नाही, असा सवाल करत आपणच सर्व केल्याचे सोडून द्या.  बेळवी ते कणगलापर्यंतच्या अनेक तलाव भरणीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

या योजनेसाठी तत्कालीन जलसंपदामंत्री बसवराज बोम्मई, मंत्री एम. बी. पाटील, ए. बी. पाटील, उमेश कत्ती, जारकीहोळी बंधूंसह अनेक नेत्यांनी सहकार्य केले आहे. त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेले बजेट लोकहितासाठी नसून केवळ जुन्या म्हैसूर राज्याच्या भागासाठी झाल्याची टीका त्यांनी केली.