Sat, Jun 06, 2020 09:25होमपेज › Belgaon › घरफोडीतील संशयित उंब्रजला ताब्यात 

घरफोडीतील संशयित उंब्रजला ताब्यात 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

निपाणी परिसरात दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालत घरफोड्या करून दहशत माजविणार्‍या सराईत दरोडेखोर टोळीतील संशयितांना सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. निपाणी पोलिसांचे पथक बुधवारी उंब्रज येथे पोचलेे.

दोन महिन्यांत परिसरात 30 हून अधिक घरफोड्या झाल्या असून लाखो रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. 25 रोजी रात्री बिरोबानगर, लेटेक्स कॉलनीत तीन ठिकाणी घरफोड्या करून 2.50 लाखांची रोकड व 12 तोळे सोने, चांदी चोरट्यांनी लांबविले. या घटना गांभीर्याने घेऊन पोलिसांनी तपासाला गती दिली. दि.21 रोजी सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे नगर जिल्ह्यातील सशस्त्र टोळीने दरोडा टाकून वृद्धेेचा खून करून 49 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खास खबर्‍यांकरवी तसेच सीसीटीव्ही फुटेज व दरोड्याची पद्धत लक्षात घेऊन टोळीचा माग काढत महामार्गावर सापळा रचला. रविवार दि.26 रोजी पहाटे पथकाला सदर संशयित टोळी उंब्रजजवळ आढळून आली. चालक व वाहन सोडून दरोडेखोरांनी आपले गाव गाठले. सातारा पोलिसांनी पाठलाग करून चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

या टोळीने उंब्रज येथे दरोडा टाकून वृद्धेचा खून केल्याची कबुली दिली.  निपाणी येथे घरफोड्या केल्याचे सांगितले. सातारा पोलिसांनी निपाणी पोलिसांशी मंगळवारी संपर्क साधून  घरफोड्यांची माहिती घेतली. संशयितांची खातरजमा करण्यासाठी  सीपीआय किशोर भरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बुधवारी सातार्‍याकडे रवाना झाले. या टोळीतील आणखी काहीजण फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.