Mon, Apr 22, 2019 23:46होमपेज › Belgaon › निपाणी येथे घरफोडी; ७ लाखांचा ऐवज लंपास

निपाणी येथे घरफोडी; ७ लाखांचा ऐवज लंपास

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 1:00AMनिपाणी : प्रतिनिधी

येथील माने प्लॉटमधील श्रीकांत बंडेराव घोडके यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 तोळे सोन्याचे दागिने व 50 हजार रुपये रोख असा सुमारे 7 लाख रुपयांचा ऐवज लांबविला. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घोडके यांचे बॅ. नाथ पै चौक (बेळगाव नाका) येथे पान दुकान आहे. तब्येत बरी नसल्याने ते कोल्हापूरला खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी सायंकाळी त्यांची पत्नी व दोन मुली कोल्हापूरला गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून घर फोडले.

दोन तिजोर्‍यांची लॉकर कटावणीने उचकटून स्टील डब्यासह दोन पर्समध्ये लग्‍नकार्यासाठी घेतलेले 22 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले. पण, चांदीचे दागिने मात्र तेथेच सोडले.  

बुधवारी सकाळी  नेहमीप्रमाणे घोडके यांच्या घरी न्यूजपेपर टाकणारा मुलगा गेल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. त्याने शेजार्‍यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी रवी घोडके, धनाजी क्षीरसागर, संजय चिकोडे, मुकुंद रावण यांनी पाहणी केली व घरफोडीचा निरोप  घोडके कुटुंबाला दिला. श्रीकांत यांचा मुलगा विश्‍वंभर घरी पोचल्यानंतर चोरीचा तपशील कळला. त्यानंतर शहर पोलिसांना कळवण्यात आले.

घटनास्थळी उपाधीक्षक दयानंद पवार, सीपीआय मुत्ताणा सरवगोळ, सहायक निरीक्षक एम. जी. निलाके, हवालदार रमेश पन्‍नूर यांनी पाहणी केली. बेळगाव येथील श्‍वानासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पण, श्‍वान परिसरातच घुटमळले. 

पाच महिन्यांपूर्वी एकाच महिन्यात किमान 30 घरफोड्या  झाल्या होत्या. आता पुन्हा घरफोडी झाल्याने पोलिस यंत्रणा हादरली आहे. चोरट्यांनी राजू मेस्त्री यांच्या गॅरेजचेही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. आजतागायत माने प्लॉट परिसरात झालेल्या चोरीच्या प्रत्येक घटनेवेळी या गॅरेजच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे.