होमपेज › Belgaon › गावातून बैलगाडी होतेय लुप्‍त...

गावातून बैलगाडी होतेय लुप्‍त...

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 8:34PMखानापूर: राजू कुंभार

स्वयंचलित वाहने येण्यापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणारी  बैलगाडी आज काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहे. एकेकाळी  बैलगाडी ग्रामीण जीवनाचा मानबिंदू, शेतकर्‍याच्या श्रीमंतीचा मानाचा तुरा आणि खिल्‍लारी जोडीचे वैभव होती.गावकुसाबाहेरच्या झाडाखाली गावतील सर्व बैलगाड्या एकत्र लावलेल्या दृष्टीस पडायच्या.  लग्नाच्या वरातीपासून राजकारणात बाजी मारलेल्या मंत्र्यांची विजयी मिरवणूक काढण्यापर्यंत बैलगाडी असायची. आत तिची जागा वाहनांनी घेतली आहे. 

बैलगाडीची निर्मिती (बांधणी)

गेल्या 40 वर्षापासून बैलगाडीची बांधणी करणारे रुमेवाडी येथील शिवाजी केशव सुतार सांगतात, लाकडी बैलगाडीची बांधणी करणारे सुतार कारागीर बांधणीच्या परंपरागत कौशल्यांचा, पध्दतीचा वापर आजही करतात. देशातील विविध प्रांतात बैलगाडीचा आकार, बनविण्याची पध्दत वेगवेगळ्या धाटणीची असते.गाडीची जोडणी ही कोणत्याही इलेक्ट्रिक साधनाच्या वापराविना अगदी अचूक करण्यात येते. बांधणीसाठी लागणारी अवजारेही कारागीर स्वतःचा बनवतो. जादातर यासाठी बाभळीच्या (जाली)लाकडाचा वापर होतो.

तसेच चाकाची पट्टी, इरस आणि बेअरिंगसाठी जवळपास 48 ते 50 किलो पक्क्या लोखंडाची गरज असते. लाकडी चाकावर लोखंडी पट्टी चढविण्यासाठी ती तापवावी लागते. त्यासाठी कोळसा आणि शेणकुटांचा वापर होतो. यातील प्रत्येक जोडणीला एक विशिष्ठ माप असून यात थोडाजरी फरक झाल्यास बैलांना मोठा त्रास होतो. त्यामुळे एका बैलगाडीची जोडणी एकच कारागीर करतो. हे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.  

लुप्त होण्याची कारणे

अलिकडे शेतीमाल वाहून नेण्यासाठी तसेच जमिनीची मशागत करण्यासाठी अनेक प्रकाराची वाहने, स्वयंचलित अवजारे मोठ्याप्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे बैलगाडीचा वापर कमी झाला आणि त्यानंतर हळूहळू बैलगाड्या लावलेल्या जागीच सडून गेल्या. मात्र केवळ बैलगाडी आणि बैल यांच्या अस्तित्वाला धोका आहे असे नाही. तर त्याबरोबर परंपरागत चालत आलेली सेंद्रिय शेती पध्दतही लुप्त होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रासायनिक घटक असलेले धान्य खाण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

चित्रपट सृष्टीलाही बैलगाडीची भुरळ

जुन्या काळातील अनेक मराठी चित्रपटांमध्ये बैलगाडीचा एकतरी प्रसंग आढळतो. जीवा-शिवाची बैलजाड या गाण्यापासून घुंगराची, घुंगराची गाडी घुंगराची या गाण्यापर्यंत बैलगाडीचा महिमा आहे. तिसरी कसम या हिंदी चित्रपटातील सर्व प्रसंग हे बैलगाडी केंद्रस्थानी ठेवून आहेत. दो बिघा जमीन, देवदास, आशीर्वाद, गीत गाता चल या चित्रपटांत बैलगाडीवरचे प्रसंग मोठ्याप्रमाणात आढळतात.

खानापुरातील बैलगाडीला परराज्यातही मागणी होती

तालुक्यातील जंगलात मुबलक प्र्रमाणात उत्तमप्रतीचे बाभळीचे लाकूड उपलब्ध होते.तसेच सध्याच्या भीमगड परिसरात असणार्‍या दुर्गम गावात कोळसा उत्पादन मोठ्याप्रमाणत होत असे. गोव्यातील पोर्तुगीज काळातील बंद पडलेली यंत्रे, गाड्या, औद्योगिक वसाहती, रस्ता बनविण्यासाठी आणण्यात आलेले रुळ, जहाजातील मोडकळीस आलेले भाग यातून पक्के लोखंड खानापुरात येत होते. त्यामुळे येथील बैलगाडी मजबूत आणि दर्जेदार व्हायची.  गोवा, महाराष्ट्र आणि हैद्राबाद येथेही येथील बैलगाड्यांना मागणी होती. त्या परिसरातून आलेले दलाल व शेतकरी बैलगाडी तयार करुण घेण्यासाठी महिनाभर मुक्काम ठोकत असत. सध्या मुन्नवळी, यरगट्टी, बागेवाडी आदी ठिकाणाहून बाभळीचे लाकूड आणण्यात येते.