Wed, Sep 19, 2018 13:08होमपेज › Belgaon › शेतकर्‍यांना कर्जमाफी, कर्मचार्‍यांना वेतनवाढ?

शेतकर्‍यांना कर्जमाफी, कर्मचार्‍यांना वेतनवाढ?

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:33PMबंगळूर : प्रतिनिधी

विद्यमान राज्य सरकारचा अखेरचा आणि सहावा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 16)विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि सरकारी कर्मचार्‍यांना वेतनवाढ या दोन लोकप्रिय निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पूर्ण अर्थसंकल्पच मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारी नोकरांच्या वेतनात सुमारे 20 ते 30 टक्के वाढीची व शेतकर्‍यांच्या पीककर्ज माफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.  सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. आर. श्रीनिवासमूर्ती यांनी सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात 30 टक्के वाढीची शिफारस केली आहे. याची तरतूद अर्थसंकल्पात होईल, असे सांगण्यात येत आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर 10 हजार 508 कोटींचा भार पडेल. तर लाभ सुमारे 5 लाख कर्मचारी आणि 5 लाख 73 हजार निवृत कर्मचार्‍यांना लाभ होईल.

मुख्यमंत्र्याचा 13 वा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या कारकिर्दीतील 13 वा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करतील. त्यांनी आजवर एच. डी. देवेगौडा, जे. एच. पटेल, धरमसिंग या तीन मुख्यमंत्र्यांच्या काळात अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. सध्याही त्यांच्याकडेच अर्थमंत्रिपद आहे.