Fri, Jul 19, 2019 07:27होमपेज › Belgaon › कामाचा सल्ला देणार्‍या भावाचा खून 

कामाचा सल्ला देणार्‍या भावाचा खून 

Published On: Jan 21 2018 2:44AM | Last Updated: Jan 20 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

घरात बसून राहण्यापेक्षा काही तरी कामधंदा कर, असा सल्ला देणार्‍या मोठ्या भावाचा लहान भावाने खून केला. लोकेश नागाप्पा सानीकोप (वय 31) असे मृताचे नाव आहे. संतोष सानीकोप (वय 30) याला अटक करण्यात आली आहे. त्याने  लोकेशच्या डोक्यावर खलबत्त्याने हल्ला केला. यामध्ये लोकेश ठार झाला.  सदर घटना शुक्रवारी सायंकाळी रामतीर्थनगर येथे घडली. सदर खुनाची नोंद माळमारुती पोलिसांत रात्री उशिरा झाली. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी आणि शंकर मारिहाळ घटनास्थळी आले. 

लोकेश आणि संतोषची आई वीजपुरवठा विभागाची कर्मचारी आहे. आई कामावर गेली असताना शुक्रवारी दुपारी संतोष आणि लोकेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. संतोष हा काहीच काम करत नसल्याने लोकेशने त्याला घरी बसून राहण्यापेक्षा काही तर काम कर असे सांगितले. 

लोकेश हा घराबाहेर जात असल्याचे पाहून रागाने बेभान झालेल्या संतोषने खलबत्ता उचलून लोकेशच्या डोक्यात घातला.  त्यामुळे काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा त्यांची आई घरी आली असता  खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी रात्री उशिरा पंचनामा करून लोकेशचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. त्याचबरोबर संतोषला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता संतोषला  न्यायालयीन कोठडी बजाविली आहे.