Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Belgaon › ‘इंदिरा कँटीन’च्या विस्ताराला लागला ब्रेक

‘इंदिरा कँटीन’च्या विस्ताराला लागला ब्रेक

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

याआधीच्या काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या ‘इंदिरा कॅन्टिन’ योजनेच्या विस्ताराला ब्रेक लावण्यात आला आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या कॅन्टिनसाठी अनुदान मंजूर केले जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नव्याने कॅन्टिन सुरू होणार नाही. यामुळे बेळगावात किल्ला भाजी मार्केट परिसरात सुरू करण्यात आलेले कॅन्टिन कार्यरत राहणार आहे. इतर कोणत्याही ठिकाणी तूर्तास कॅन्टिन सुरू होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी काँग्रेस सरकारने राज्यातील अनेक ठिकाणी कॅन्टिन सुरू केले. बेळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पंधरा ठिकाणी इंदिरा कॅन्टिन सुरू करण्यात येणार होते. शहरात केवळ किल्ला भाजी मार्केट येथे कॅन्टिन सुरू झाले. एपीएमसी आवार, जिल्हा रुग्णालय, केएमएफ, गोवावेस, नाथ पै सर्कल व आझमनगर या ठिकाणी कॅन्टिन सुरू करण्यासाठी तयारी करण्यात आली. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतर योजना रखडली. आता काँग्रेस - निजद युती सरकार अस्तित्वात आल्याने कार्यरत असणारेच कॅन्टिन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

सर्वप्रथम बंगळुरात इंदिरा कॅन्टिन सुरू झाले. तेथील प्रतिसादामुळे राज्यातील जिल्हा, तालुका, शहर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विभाग पातळीवर कॅन्टिन सुरू करण्याची योजना आखण्यात आली. 211 कोटी रुपयांत 247 ठिकाणी कॅन्टिन सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आमदारांनी लोकसंख्येच्या आधारावर कॅन्टिनची संख्या वाढविण्याची मागणी केली. त्यानुसार ही संख्या नंतर 263 वर गेली. मध्यम आणि गरीब वर्गातील मतदारांची मते मिळविण्यासाठी योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत काँग्रेसचे होते. जूनअखेरपर्यंत कॅन्टिनची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे कामे खोळंबली.

आतापर्यंत 131 कॅन्टिनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी 73 कॅन्टिन्सना अन्नधान्याचा पुरवठा होत आहे. आणखी 132 कॅन्टिन बांधण्यात येणार आहेत. मात्र, त्यांचा कार्यारंभ होण्याबाबत साशंकता आहे. 

खर्च कपातीची सूचना
सूत्रांकडून उपलब्ध माहितीनुसार अर्थसंकल्प तयारीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत अधिकार्‍यांनी अनेक कॅन्टिन बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले. सध्या कार्यरत असणारेच कॅन्टिन सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून शक्य तितका कमी खर्च यासाठी करण्याची सूचनाही त्यांनी दिल्याचे समजते.