Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Belgaon › ब्राह्मण जात नसून संस्कार-जीवन पध्दत

ब्राह्मण जात नसून संस्कार-जीवन पध्दत

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 12 2018 11:33PMजमखंडी : वार्ताहर

ब्राह्मण केवळ जात नसून संस्कार व जीवन पध्दत आहे. सर्वांना संस्कार, विद्यादान देणारा संस्कारप्रधान ब्राह्मण असल्याचे प्रतिपादन माजी विधान परिषद सदस्य गो. मधुसूदन यांनी जमखंडी तालुक्यातील पहिल्या ब्राह्मण महासंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या जमखंडी शाखेने येथील व्होक्‍कळभावी अनंतराव साबडे मैदानात गुरुदेव रानडे सभागृहात महासंमेलन आयोजित केले होते.

विश्व प्रपंचाचे चिंतन, भविष्य हितरक्षण करणारा ब्राह्मण असल्याचे पुरोहित, देशपांडे आदी आडनावांची उदाहरणे देऊन मधुसूदन यांनी स्पष्ट केले. अध्ययन करून अध्यापन करणे, यज्ञ करणे व यज्ञ करविणे, दान देणे व दान घेणे अशी ब्राह्मणांची सहा सूत्रे असून देशात हीन राजकारण करून काहीजण समाजात फूट पाडून अराजकता माजवू पाहत आहेत.  देशाची संस्कृती, परंपरा टिकविण्याची व देश एकसंध राखण्याची जबाबदारी ब्राह्मण समाजाने पार पाडावी, असे आवाहन केले. संस्कार देण्याच्या व परंपरेचे रक्षण करण्याच्या कार्यात महिलांची जबाबदारी अधिक असून त्यांच्या पोटी श्रेष्ठ पुत्र जन्माला येवो, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ब्राह्मण समाज सुशिक्षित असून आरक्षणाची मागणी न करणार्‍या समाजबांधवांनी उद्योगक्षेत्रात पुढे यावे, असे प्रतिपादन सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ यांनी केले. अन्य समाजाचा विश्‍वास ब्राह्मण समाजावर असल्याने तो सार्थ ठरविणारी कामे करावीत, असे आवाहन आ. गाडगीळ यांनी करून मराठवाड्यात ब्राह्मण समाज संघटित होऊन कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ब्राह्मण समाज केवळ 7 ते 8 टक्के असला तरी कधीही राष्ट्रविरोधी काम करीत नाही. सरकार कोणाला कितीही आरक्षण देवो पण आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित केल्यास अथवा समाजाची अवहेलना केल्यास त्याचा प्रतिकार करणारच, असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष व अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष के. एस. वेंकटनारायण यांनी केले. तेलंगाणा, केरळ, आंध्र आदी सात राज्यांतून ब्राह्मण समाजाकरिता योजना सुरू असून त्याप्रमाणे कर्नाटकात ब्राह्मण विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. डॉ. गिरीश मसूरकर, महेश जोशी यांनीही विचार व्यक्त केले.

श्रीकांत कुलकर्णी, सिद्दू सवदी, हणमंत कोटबागी, टी. एच. कुलकर्णी, साधना पोटे आदी उपस्थित होते. वेंकण्णाचार्य यांच्या वेदघोषाने, कट्टी व सहकारी यांच्या नाडगीताने संमेलनाचा प्रारंभ झाला. विजयलक्ष्मी कित्तूर यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा. विनायक कुलकर्णी यांनी स्वागत केले.