Sun, Mar 24, 2019 23:15
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › शिक्षकदिनाच्या कार्यक्रमावर मराठी सदस्यांचा बहिष्कार

शिक्षकदिनाच्या कार्यक्रमावर मराठी सदस्यांचा बहिष्कार

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 05 2018 11:35PMखानापूर : प्रतिनिधी

तालुकास्तरीय शिक्षकदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेतून मराठीला वगळणार्‍या अधिकार्‍यांचा निषेध करत मराठी भाषक जि. पं. व ता. पं. सदस्यांनी तालुकास्तरीय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मात्र, देशाचे शिल्पकार असणार्‍या शिक्षकांचे कर्तृत्व स्मरण करताना ता. पं. सभागृहात स्वतंत्ररित्या शिक्षकदिन साजरा करुन डॉ. राधाकृष्णन यांना अभिवादन केले. 
गांधीगिरी स्टाईलने स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी या अनोख्या पद्धतीचे अवलंब केलेल्या सदस्यांच्या वागणुकीची दिवसभर चर्चा सुरु होती.

शिक्षकदिनाच्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका दरवर्षी दोन्ही भाषेतून छापली जाते. गेल्या अनेक  वर्षापासूनची ही अलिखित परंपरा आहे. तालुक्यात भाषाबांधव्याचे उत्तम व आदर्श उदाहरण म्हणून शिक्षणखात्याकडे बघितले जाते. मात्र यावर्षीच्या आमंत्रण पत्रिकेतून जाणीवपूर्वक मराठीला वगळण्यात आले.

केवळ कन्नड भाषेतून छापण्यात आलेल्या पत्रिकांचे शाळा, शिक्षक व लोकप्रतिनिधींना वितरण करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेला फाटा देत मराठी बहुभाषिक असतानाही मराठीला डावलण्याचे धाडस अधिकार्‍यांनी दाखविले होते. याबाबत मराठी भाषक ता. पं. व जि. पं. सदस्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

मराठी लोकप्रतिनिधींची आक्रमक भूमिका पाहून मंगळवारी रात्री शंभरच्या आसपास मराठी आमंत्रण पत्रिका छापून रात्री दहापर्यंत त्याचे वाटप करण्याचे काम सुरु होते. हा केवळ चुकीवर पांघरुन घालण्यासाठी सुरु असलेला खटाटोप असल्याचे सांगून सर्व मराठी सदस्यांनी आज (बुधवारी) ता. पं मध्ये हजेरी लावली.

गांधीगिरी स्टाईलने अधिकार्‍यांना धडा शिकविण्याचा निर्धार करुन साधेपणाने शिक्षकदिनाचे आचरण करण्यात आले. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ता. पं. सदस्य बाळासाहेब शेलार यांनी मराठीला डावलण्यामागे हात असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दि. 11 सप्टेंबर रोजी होणार्‍या ता. पं. च्या बैठकीत याप्रश्‍नी अधिकार्‍यांना जाब विचारुन प्रसंगी बैठकीवरही बहिष्कार टाकण्याची तयारी असल्याचे ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत यांनी सांगितले.

यावेळी ता. पं. अध्यक्षा नंदा कोडचवाडकर, उपाध्यक्षा श्‍वेता मजगावी, जि. पं. सदस्य नारायण कार्वेकर, जयराम देसाई, ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, बाळासाहेब शेलार, कविता कुंभार, प्रकाश चव्हाण, माजी ता. पं. सदस्य महादेव घाडीआदी उपस्थित होते.

मराठीच्या हक्कासाठी झगडताना शिक्षकांप्रती आदराची भावनाही मराठी लोकप्रतिनिधींनी कमी होऊ दिली नाही. त्यांच्या या अनोख्या निषेध आंदोलनाची शहरासह शैक्षणिक वर्तूळात जोरदार चर्चा ऐकावयास मिळत होती.