Mon, Jun 17, 2019 18:33होमपेज › Belgaon › ...तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार 

...तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार 

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:12PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

शहरातील नगरविकास प्राधिकारकडून उभारण्यात आलेल्या रामतीर्थनगरवासियांना गेल्या 20 वर्षापासून मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अनेकवेळा मागणी करूनही प्राधिकारने दुर्लक्ष केले आहे. पिण्याचे पाणी व रस्ते, पथदीप, उद्यान, भुयारी गटारे आदी सुविधा अद्यापही उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याबद्दल रहिवाशांतून तीव्र संताप व्यक्त करून जिल्हाधिकार्‍यांच्या नावे निवेदन देण्यात आले. याची तत्काळ दखल न घेतल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशाराही देण्यात आला आहे. 

येथील नगरविकास प्राधिकारकडून 1998 मध्ये रामतीर्थनगर उभारण्यात आले आहे. मात्र याठिकाणी मूलभूत सुविधा पुरण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील रहिवाशांना 8 ते 10 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. केवळ 1 तास पाणी सोडले जाते. मात्र यामध्येही नियमितपणा नाही.पिण्याचे पाणी दोन दिवसातून एकदा सोडले जाते. मध्यरात्रीही पाणी पुरवठा केला जातो. याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 15 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या गटारी बुजून गेल्या आहेत. तर गेल्या 15 वर्षापासून रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्यावेळी ये-जा करणेही कठीण जात आहे. 

10 वर्षापूर्वी बसविण्यात आलेले पथदीपही निकामी ठरत आहे. याची देखभाल होत नसल्याने रात्रीच्यावेळी नागरिकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. उद्यानासाठी राखीव जागा ठेवण्यात आली आहे. मात्र त्याचा उपयोग झालेला नाही. सदर जागेचा शोध घेऊन उद्यान तयार करण्यात यावे. भुयारी गटारींची सुविधा नसल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. सदर मागण्यांची तत्काळ दखल न घेतल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णयही घेतला आहे. प्रशासनाने याचा त्वरित विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे. 
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या आ. सतीश जारकीहोळी यांनाही निवेदन देऊन दखल देण्याची मागणी रहिवाशांनी केली. 

यावेळी विलास केरुर, चेतन शेट्टी, रविकुमार मेळवंकी, अक्कमहादेवी चित्तडगी, आर. आर. दोडमनी, सी. एम. तोट्टतपूर, एस. एम. सोनटक्की यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.