Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Belgaon › मेळाव्याने  समितीच्या कार्यकर्त्यांना आले बळ

मेळाव्याने  समितीच्या कार्यकर्त्यांना आले बळ

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 8:57PMखानापूर : प्रतिनिधी

जांबोटी येथे बुधवारी झालेल्या म. ए. समितीच्या मेळाव्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांना नवे बळ आले. आता प्रतीक्षा नेत्यांनी एकत्र येण्याची आहे. मेळाव्याला लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि मध्यवर्ती समितीच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती, यामुळे समितीत फूट पाडू पाहणार्‍यांना घाम फुटला. राष्ट्रीय पक्षांतील नेत्यांचे धाबे दणाणले. आ. अरविंद पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सीमासत्याग्रहींचा जाहीर सत्कार करून तरुणवर्गात जागृती करून मेळावा यशस्वी केला.

इच्छुकांना आवर घालत संघटना मजबुतीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची सूचना ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यवर्तीकडे केली होती. ती  लक्षात घेऊन माजी आ. दिगंबर पाटील, आ. पाटील यांनी विविध उपक्रमांच्या आधारे तालुक्यात जागृतीचे  कार्य हाती घेतले आहे. कार्यकर्ते गावोगावी फिरुन निवडणुकीत समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची विनंती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जांबोटीत बुधवारी मेळावा झाला. कर्नाटक शासनाच्या विरोधात, तसेच सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासंदर्भातील घोषणांनी सभागृह दणाणले.

कुसमळी, बैलूर, उचवडे, कणकुंबी, पारवाड आदी भागातून मोठ्या संख्येने  आलेल्या  तरुणांनी ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधला. चार वर्षात मराठी भाषा-संस्कृती रक्षणासाठी रस्त्यावरची लढाई प्रभावीरीतीने झाली नसल्याने तरुण चळवळीपासून अलिप्त होता. मात्र मेळाव्याने तरुणांमध्ये  नवचैतन्य निर्माण झाले आहे. आता प्रमुख नेत्यांकडून कितपत प्रतिसाद मिळणार, हे पाहावे लागणार आहे.

सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या वळणावर असताना घटक समित्या सक्षम करुन त्यात तरुणांना सहभागी करणे अत्यावश्यक आहे. जनतेच्या समस्या मांडणे,  मराठीच्या संवर्धनासाठी उपक्रम, सरकारच्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करणे अशी कामे  घटक समित्यांकडून होऊ शकतात. बेळगावबरोबर खानापुरातील  चळवळीला बळकटी देण्यासाठी घटक समित्यांना ठोस कार्यक्रम देण्याची मध्यवर्तीची प्रमुख जबाबदारी आहे.