Wed, Nov 14, 2018 21:05होमपेज › Belgaon › जागृती सभांनी मराठी भाषकांत चैतन्य

जागृती सभांनी मराठी भाषकांत चैतन्य

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:03PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती म. ए. समिती सक्रिय झाली आहे. 31 मार्च रोजी सीपीएड मैदानावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत विराट सभेचे आयोजन केले आहे. यासाठी सीमाभागात जागृती मोहीम राबविण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. एक लाखाहून अधिक मराठी बांधव सभेला उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सभेच्या जागृतीसाठी काही दिवसांपासून बेळगाव तालुक्यात जोमाने जागृती मोहीम हाती घेतली आहे. अनेक गावांतून सभा, बैठका, मेळावे, प्रचार पत्रके या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. ग्रामीण भाग ढवळून निघाला आहे. 19 रोजी उचगाव येथे पश्चिम भागातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.

तत्पूर्वी बेळगाव दक्षिण मतदारसंघातील जुने बेळगाव येथे 20 रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी कोल्हापूर जि. प. चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने व सीमा खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार दिनेश ओऊळकर मार्गदर्शन करणार आहेत. शहर परिसरात होणारा हा पहिलाच मेळावा आहे. यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. सभेला बेळगाव शहरासह दक्षिण मतदारसंघातील गावांतून प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. मच्छे, पिरनवाडी, येळ्ळूर, खादरवाडी, झाडशहापूर परिसरात बैठका घेण्यात आल्या आहेत. यासाठी गल्ली-बोळ पिंजून काढण्यात येत आहे.

बेळगाव शहर आणि तालुक्यासह खानापूर तालुक्यातील म. ए. समितीकडून जागृती करण्यात येत आहे.  आ. अरविंद पाटील व माजी आ. दिगंबर पाटील यांच्या स्वतंत्र नेतृत्वाखाली जागृती करण्यात येत आहे. आ. पाटील यांनी जांबोटी येथे घेतलेल्या मेळाव्यात 31 मार्चच्या सभेबाबत मध्यवर्ती म. ए. समितीकडून प्रचार करण्यात आला.