होमपेज › Belgaon › बाटलीबंद शुद्ध पाण्याचा ‘अशुद्ध धंदा’!

बाटलीबंद शुद्ध पाण्याचा ‘अशुद्ध धंदा’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

आरोग्यासाठी सजग असणार्‍यांकडून नेहमीच बाटलीबंद शुद्ध पाण्याचा आग्रह केला जातो. परंतु शुद्ध पाण्याच्या या बाटलीबंद धंद्यात अशुद्ध पाण्याचाच अधिक प्रमाणात व्यवसाय असल्याचे दिसून आले आहे. यामुळे संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांकडून जिल्ह्यात बाटलीबंद पाणी व्यवसायाची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे व्यवसायातील धेंडांचे धाबे दणाणले आहेत.

बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय आरोग्याशी संबंधित आहे. यासाठी बीएसआय (भारतीय गुणनियंत्रक संस्था) कडून आयएसआय प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. सध्या शहर परिसरात शुद्ध पाण्याच्या नावावर व्यवसाय करणार्‍या कंपन्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांना आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात याप्रकारे उद्योग अधिक प्रमाणात आहेत. परंतु त्यापैकी केवळ सहा उद्योगाकडे व्यवसायासाठी आवश्यक आयएसआय प्रमाणपत्र आहे. उर्वरित कंपन्याकडून सरकारी निकषाची पूर्तता करण्यात आलेली नाही. अशा कंपन्यांचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे.

शुद्ध बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणार्‍या कंपन्याचे पेव फुटले आहे. त्याचबरोबर नजीकच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातूनही याप्रकारचे बाटलीबंद पाणी येते. हॉटेल, कोल्ड्रिंक हाऊस, पान टपर्‍या यामध्ये याप्रकारच्या बाटल्या उपलब्ध असतात. त्यांचाही शोध घेऊन कारवाई होणार आहे.मध्यंतरी काही नागरिकांनी आणि संघटनांनी बनावट पाणी कंपन्यांचा शोध घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी अधिकार्‍यांची व बाटलीबंद पाण्याचा व्यावसायिकांची बैठक घेऊन सूचना केली होती. त्याचबरोबर अधिकार्‍यांना आयएसआर प्रमाणपत्र नसणार्‍या व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती.

व्यवसायाच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. यामुळे कारवाई रखडली होती. परंतु उच्च न्यायालयाने आयएसआय प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला. यामुळे राज्याच्या सहआयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना बजावले आहेत. परिणामी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार विक्रीला उपलब्ध असणार्‍या बाटल्यापासून प्रकल्पाचाही शोध घेतला जाणार आहे. त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाणार आहे.