Tue, Mar 19, 2019 09:51होमपेज › Belgaon › सीमाप्रश्नी उद्या बैठक

सीमाप्रश्नी उद्या बैठक

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:43AMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ समितीची बैठक गुरुवार दि. 26 रोजी मुंबई येथे सकाळी 10.30 वा. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आयोजित केली आहे. सदर बैठक प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. सीमाप्रश्नाचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. खटला रोस्टर पद्धतीने सुनावणीसाठी येणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्राकडून खटल्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. सीमाप्रश्नाचा खटला महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. कोणत्याही वेळी खटल्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भक्‍कम तयारी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राकडून तयारी करण्यात येत आहे.

न्यायालयाने फेटाळलेली कर्नाटकाची याचिका फेरविचारासाठी येणार आहे. त्याचबरोबर अंतरिम अर्जावरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकाने सीमाप्रश्‍नावर सुनावणी करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असा दावा केला होता. आर. एम. लोढा सरन्यायाधीश असताना त्यांनी ही मागणी फेटाळली होती. सीमाप्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयाला सुनावणीचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी कर्नाटकाच्या याच मुद्याचा फेरविचाराचा दावा दाखल करून घेतला आहे. याविषयी बैठकीत चर्चा होणार आहे.

865 गावांतील विद्यार्थी आणि पदवीधरांना महाराष्ट्रात 3 टक्के आरक्षण आहे. त्याकरिता बेळगाव जिल्हाधिकार्‍यांकडून ‘वादग्रस्त भागातील रहिवासी’ असा दाखला देणे आवश्यक आहे. पण, जिल्हाधिकार्‍यांकडून तसा दाखला दिला जात नाही. परिणामी अनेकांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. हा विषयही बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.बैठकीत सीमाभागातून मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, माजी आम. संभाजी पाटील, निपाणी म. ए. समिती अध्यक्ष जयराम मिरजकर सहभागी होणार आहेत.