Mon, Sep 24, 2018 07:38होमपेज › Belgaon › सीमाभागात खरा मावळा

सीमाभागात खरा मावळा

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 28 2018 1:15AMबेळगाव, बेळगुंदी  :प्रतिनिधी

सतत 60 वर्षे मराठीसाठी लढणारा सीमावासीय हा खरा मावळा आहे. त्याच्यामुळेच सीमाभागातील मराठी टिकून आहे. शिवरायांनीही राज्य कारभाराची भाषा मराठीच राहण्यासाठी आग्रह धरला होता. तोच आग्रह सीमावासी महाराष्ट्रात येण्यासाठी धरतो आहे, झगडतो आहे, असे विचार युवा मेळाव्यात मान्यवरांनी व्यक्‍त केले. मराठी भाषा दिन, युवा मेळावा आणि सीमावासीयांचे ऐक्य असा तिहेरी संगम साधून मंगळवारी रात्री बेळगुंदीत झालेल्या युवा मेळाव्यात शिवरायांचा लढा आणि सीमावासीयांचे आंदोलन याचा इतिहास मांडण्यात आला.

कोल्हापूर जि. प. माजी उपाध्यक्ष प्रमुख वक्‍ते धैर्यशील माने  म्हणाले, शिवरायांनी सर्वांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली. मराठ्यांच्या जीवावर स्वराज्य उभारले; पण आजच्या युगात अनेकांनी आम्हाला भूलथापा दिल्या; पण आमची मराठी जितकी गोड, तितकीच तिखट आहे. आता हा तिखटपणा मराठी अस्मिता दुखावणार्‍यांना दाखवून दिलाच पाहिजे. अध्यक्षस्थानी गणपती शहापूरकर होते. मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सुभाषित पाटील, जि. पं. सदस्य सरस्वती पाटील व्यासपीठावर होते. स्वागत प्रा. डी. डी. बेळगावकर यांनी केले.