होमपेज › Belgaon › गवाळी-कोंगळा भागातही ‘रहेंगे तो महाराष्ट्र में’

गवाळी-कोंगळा भागातही ‘रहेंगे तो महाराष्ट्र में’

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 18 2018 10:36PMखानापूर : प्रतिनिधी

तालुका म. ए. समितीने हाती घेतलेल्या ‘समिती आमची आम्ही समितीचे’ या सीमाप्रश्‍न जागर अभियानाचे शनिवारी नेरसा, कोंगळा, गवाळी या दुर्गम भागातील नागरिकांनी घरोघरी स्वागत करून साठ वर्षानंतरही ‘रहेंगे तो महाराष्ट्र में’ चा निर्धार आजही कायम असल्याचे सांगितले.

पश्‍चिम भागातील दुर्गम टोकावर वसलेल्या वाडी-वस्त्यांवही सीमाप्रश्‍न जागर अभियानाला उदंड पाठिंबा मिळत आहे. समिती कार्यकर्त्यांनी नेरसा भागातील गावांना भेट देऊन घरोघरी सीमाप्रश्‍नाचा जागर केला.  परिसरातील नागरिकांनी सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीपर्यंत समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

नेरसा व गवाळी येथे झालेल्या कोपरा सभांना नागरिकांनी उपस्थित राहून निर्णायक क्षणी समितीच्या पाठीशी संपूर्ण पश्‍चिम भाग खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. पश्‍चिम भाग अद्यापही विकासापासून वंचित आहे. कधी तरी हा मराठीबहुल भूभाग महाराष्ट्रात जाणारच आहे. या विचाराने कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक येथील विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. नैसर्गिक समस्यांशी दोन हात करत प्रतिकूल परिस्थितीतही मराठी संस्कृती संवर्धनाचे येथील नागरिकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत तालुका म. ए. समिती अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी व्यक्त केले.

विविध राष्ट्रीय पक्षांचे लोक सर्वसामान्य मराठी भाषकाला अनेक आश्‍वासने दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मराठी भाषकांची एकी टिकवण्यासाठी तरुण पिढीला सीमालढ्याशी जोडून ठेवणे आवश्यक असल्याचे माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर यांनी सांगितले. वाड-वडीलांचा त्याग व बलिदानाचा वारसा न विसरता युवकांनी महाराष्ट्र ध्येयासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन प्रकाश चव्हाण यांनी केले. ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, आबासाहेब दळवी, महादेव घाडी,  के. पी. पाटील, विवेक गिरी यांनीही जनतेशी संवाद साधून सीमाचळवळीत सक्रिय होण्याचे आवाहन केले. बी. बी. पाटील, रुक्माना झुंजवाडकर, गणपत गावडे, ब्रम्हानंद पाटील, अविनाश पाटील, कृष्णा मन्नोळकर, रमेश देसाई, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.