Sun, May 26, 2019 08:34होमपेज › Belgaon › सीमा हुतात्म्यांना आज अभिवादन!

सीमा हुतात्म्यांना आज अभिवादन!

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 11:20PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

भाषावार प्रांतरचना करताना बेळगावसह मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. त्यानंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात 17 जानेवारी 1956 रोजी  बळी पडलेल्या हुतात्म्यांना उद्या, बुधवारी अभिवादन करण्यात येईल. हा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.

हुतात्मा चौकात बुधवारी सकाळी 8.30 वा. अभिवादन होईल. स. 10 वा कंग्राळी (खु.) येथे अभिवादन व सभा होईल. यावेळी कोल्हापूर जिल्हा मराठा संघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत मार्गदर्शन करतील. 

खानापूर स्टेशनरोड येथील नागाप्पा होसूरकर यांना खानापूर, निपाणी येथे कमलाबाई मोहिते यांना,  कंग्राळीखुर्द येेथे पै. मारुती बेन्‍नाळकर यांना आदरांजली वाहण्यात येईल. मध्यवर्ती व शहर म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, निंगोजीराव हुद्दार, माजी आ. मनोहर किणेकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, एल. आय. पाटील, एस. एल. चौगुले, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, त्याचबरोबर  शिवसेनेच्या वतीने बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, मराठी भाषिक युवा आघाडीच्या वतीने भाऊराव गडकरी यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

17 जानेवारी 1956.... सीमावासीयांच्या जीवनातील काळाकुट्ट दिवस. या दिवशी झालेल्या पोलिस गोळीबारात पै. मारुती बेन्‍नाळकर, मधू बांदेकर,महादेव बारागडी व लक्ष्मण गावडे आणि निपाणीत श्रीमती कमळाबाई मोहिते या बळी पडल्या. 9 मार्च 1956 रोजी सुरू झालेल्या सीमा सत्याग्रहात भाग घेतलेल्या नागाप्पा होसूरकर या सत्याग्रहीने हिंडलगा कारागृहात प्राणार्पण केले. 1 नोव्हेंबर 1958 पासून सुरू झालेल्या दुसर्‍या सीमा सत्याग्रहात गोपाळ चौगुले या सत्याग्रहीने बळ्ळारी कारागृहात प्राणार्पण केले. मुंबई येथे शिवसेनेने सीमाप्रश्‍नासाठी उभारलेल्या प्रचंड आंदोलनात 67 शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. कन्‍नड सक्‍तीच्या निषेधार्थ संयुक्‍त महाराष्ट्र सीमा समितीने 1 जून 1986 रोजी केलेल्या आंदोलनात हिंडलगा येथे मोहन पाटील, परशराम लाळगे व भरमाण्णा कदम यांचा पोलिसांनी केलेल्या निर्घृण गोळीबारात बळी पडला. बेळगुंदी येथे झालेल्या गोळीबारात भावकू चव्हाण, कल्‍लाप्पा उचगावकर व मारुती गावडा यांचा बळी गेला. जुने बेळगाव येथे शंकर खन्‍नूकर, हिंदवाडी येथे विद्या शिंदोळकर हिने हौतात्म्य पत्करले. याशिवाय या सीमा आंदोलनात बॅ. नाथ पै यांनी प्राणार्पण केले.