Thu, Aug 22, 2019 04:14होमपेज › Belgaon › शेतात दुचाकी नेताय? सावधान..!

शेतात दुचाकी नेताय? सावधान..!

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 18 2018 8:10PMबेळगाव : प्रतिनिधी

साप म्हटले की भल्याभल्यांची भंबेरी उडते. पण सापाचा धोका फक्त जंगलात किंवा शेतातच आहे असे नाही. सापांचा धोका शेतात नेल्या जाणार्‍या दुचाकीमुळेही उदभवू शकतो. कसा? तर शेतात नेऊन उभी केलेल्या दुचाकीच्या इंजिनमध्ये किंवा हेडलाईट कव्हरमध्ये साप उष्णतेसाठी आश्रय घेतात. त्यामुळे शेतात दुचाकी नेत असाल तर सावधान!

पावसाळा सुरु असल्याने पावसाळी पर्यटनाला दुचाकीने जाणारे अनेक हौशी लोक आहेत. त्याबरोबरच गरज म्हणून शेतात दुचाकीवरूनही जाणारे अनेक शेतकरी आहेत. विशेषतः वैरण, चारा आणण्यासाठी दुचाकीचा वापर केला जातो. या दुचाकींमध्ये साप आश्रय घेऊ शकतो. 

विशेषतः इंजिन आणि पेट्रोल टाकीच्या मधल्या मोकळ्या जागेत, समोरचा दिवा आणि स्पीडोमीटरच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत, कधीकधी साईड बॉक्समध्ये साप लपून बसतात. 

 कारण काय?
पावसाळ्यात जमीन ओलीचिंब असते. त्या काळात सापांना उष्णता हवी असते. दुचाकीच्या इंजिनमुळे त्यांना ती उष्णता मिळते. त्यामुळे साप दुचाकीचा आश्रय घेतात.
यापूर्वी रस्त्याशेजारी लावलेल्या दुचाकीत साप लपल्याच्या आणि दुचाकी सुरू होऊन काही अंतर गेल्यानंतर इंजिन तापल्यामुळे अतिउष्णेतेने साप बाहेर आल्याच्या घटना घडल्या आहेत.

 धोका काय?
दुचाकीत लपलेल्या सापामुळे दुहेरी धोका आहे. एक तर साप दंश करु शकतो. दुसरा धोका म्हणजे साप पाहून दुचाकीचालकाची भीतीने गाळण उडू शकते. त्यामुळे अपघात होऊ शकतो. 

दक्षता काय?
खूप वेळ दुचाकी शेतात-रानात उभी केली असेल तर ती सुरू करण्यापूर्वी एकदा तपासणी करावी. इंजिनच्या वरची मोकळी जागा, दिव्यावरची मोकळी जागा तपासावी. त्यानंतरच दुचाकीवर आरुढ व्हावे.