बेळगाव : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. रस्त्यांत मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती 7 ऑगस्टपूर्वी दुरूस्ती करावी, अन्यथा तालुक्यातील सर्व गावांतील रस्त्यांमध्ये खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा तालुका म. ए. समितीने दिला.
तालुक्यातील रस्ता समस्या आणि गणेशोत्सव काळात सुरळीत वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते व हेस्कॉम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपरोक्त इशारा देण्यात आला.
किणेकर म्हणाले, सतत सुरू असणार्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यातून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघात घडत असून यातून दुर्घटना होऊ शकते. वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्ती काम हाती घ्यावे. अन्यथा 7 ऑगस्टपासून गावागावांत म. ए. समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रास्तारोको करतील, असा इशारा दिला. त्याचबरोबर हेस्कॉमने गणेशोत्सव काळात ग्रामीण भागात 24 तास वीजपुरवठा करण्याची मागणी केली.
अध्यक्ष निंगोंजी हुद्दार म्हणाले, तालुक्यातील रस्ते म्हणजे अपघाताचे सापळे बनले आहेत. प्रवासासाठी अतिशय धोकादायक बनले असून याकडे प्रशासनाकडे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला आहे. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी कंग्राळी रस्ता खराब झाल्याचे सांगितले.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी एल. आय. पाटील, कल्लाप्पा घाटेगस्ती, सुरेश राजूकर, आर. आय. पाटील, बी. डी. मोहनगेकर, कृष्णा हुंदरे, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, अॅड. शाम पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, चेतक कांबळे, बाबाजी देसूरकर, निंगाप्पा मोरे, जि. पं. सदस्या माधुरी हेगडे, ता. पं. सदस्य रावजी पाटील आदी उपस्थित होते.
तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत दै. पुढारीने वारंवार आवाज उठविला आहे. गावागावातील रस्त्यांची झालेली दुरवस्था सचित्रपणे मांडली होती. याची दखल घेत तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने दै. पुढारी अंक जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द केला. तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत 3 ऑगस्ट रोजीच्या अंकात सचित्र माहिती ‘पुढारी’ने प्रसिद्ध केली होती. हा अंक शिरस्तेदार मंजुनाथ जानकी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता द्यामण्णावर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.