Thu, Jul 16, 2020 08:08होमपेज › Belgaon › भीमगड अभयारण्यामुळे जंगलाची दौलत वाढली !

भीमगड अभयारण्यामुळे जंगलाची दौलत वाढली !

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खानापूर : वासुदेव चौगुले

भीमगड संरक्षित अभयारण्याची घोषणा 2011 मध्ये झाल्यापासून जैवविविधतेच्या संरक्षणाबरोबरच वन्यजीवांच्या संगोपनाचे काम विशेष काळजीने होत आहे. यामुळे भीमगडमधील वन्यजीवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अन्य ठिकाणच्या जंगलात मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असताना खानापूरच्या जंगलाने मात्र वन्यजीवांचे जतन करत भविष्यातील वनदौलतीचे माहेरघर म्हणून दिमाखदार वाटचाल चालवली आहे.

पश्‍चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण करण्याबरोबरच पूर्वीपासून लाभलेल्या वन्य प्राण्यांच्या ठेव्याचे जतन आणि संगोपन व्हावे, या उद्देशाने 1 डिसेंबर 2011 रोजी भीमगड वन्यजीव संरक्षित अभयारण्याची घोषणा करण्यात आली. तालुक्यातील हेम्माडगा, तळेवाडी, गवाळी, कृष्णापूर, देगांव, कोंगळा, मेंढील, जामगाव, आमगांव  अशा 12 गावांचा अभयारण्यात समावेश होतो. नागरिकांना जंगलाबाहेर न हलविता प्राण्यांच्या सहवासातच किमान संकटाचा मुकाबला करत सुरक्षित जीवन कसे जगावे, याबाबत संवादातून वनखाते जागरूकता निर्माण करत आहे.

भीमगडच्या सर्व सीमा कोणत्या कोणत्या अभयारण्याशी जोडलेल्या आहेत. एकीकडे दांडेली अभयारण्य, दुसरीकडे गोव्याच्या दिशेने असलेले मोलेम अभयारण्य आणि प. महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य. या वन्यजीवांच्या टापूतील महत्त्वाच्या जंगलभागाशी भीमगड जैविकदृष्ट्या समरस असल्याने येथील वन्यजीवांच्या वाढीवर याचा अनुकूल परिणाम जाणवत आहे.

वन्य प्राण्यांबरोबरच म्हादई नदी, दुर्मीळ वटवाघळे आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भीमगड ही महत्त्वाची ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. तळेवाडीनजीक असलेल्या बारापेडी गुहेत राँग्टन फ्रि टेल्ड बॅट्स जातीच्या दुर्मीळ वटवाघळांची प्रजाती आढळते. जगात अन्यत्र कुठेही न आढळणारी ही वटवाघळे अनेक पक्षीप्रेमी व संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय आहेत. त्यांच्या अभ्यासाकरिता मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे येतात.

बर्‍याच वेळा वन्यप्राणी जंगलाबाहेर पडून मानवीवस्तीमध्ये शिरण्याची शक्यता असते. जेथे मानवी वस्ती सुरू होते, अशा ठिकाणी  सोलार कुंपण आणि ट्रेंचद्वारे प्राण्यांना जंगलातच अटकावाचा प्रयत्न सुरू आहे. जंगलभागाच्या ठिकाणापासून जास्तीत जास्त 10 कि. मी.वर गावांच्या सभोवती किमान अर्धा कि. मी. अंतरापर्यंत संवेदनशील जंगलभाग म्हणून भूभाग निश्‍चित केला आहे. शिकारविरोधी पथकांमध्ये स्थानिकांना काम दिल्याने चाळीस जणांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. अशा अनेक योजना राबवून वनविभाग स्थानिक जनतेचे वनसंवर्धनात सहकार्य घेण्याचा प्रयत्न करत आहे.

वनमंत्री रामनाथ रै यांनी हेम्माडगा येथील भीमगड वनविभागाच्या विविध कामांची पाहणी केली. वनक्षेत्रपाल शिवानंद मगदूम आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमांचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासन दिले आहे.