Thu, Apr 25, 2019 13:25होमपेज › Belgaon › भरत कुरणे, वाघमारेसह सर्व संशयितांना‘कोका’

भरत कुरणे, वाघमारेसह सर्व संशयितांना‘कोका’

Published On: Aug 15 2018 2:04AM | Last Updated: Aug 15 2018 2:04AMबंगळूर/ पुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्व संशयितांना ‘कोका’ अर्थात कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लावण्याचा निर्णय विशेष तपास पथकाने (एटीएस) घेतला आहे. या कायद्याखाली गुन्हा नोंदवल्यास संशयितांना जामीन मिळणे दुरापास्त असते.  लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक झाली आहे. त्यात बेळगावातील भरत कुरणे आणि विजापुरातील परशुराम वाघमारे यांचाही समावेश आहे. सर्वांवर ‘कोका’खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कायद्याखाली तपास पथकाला संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी मिळतो. तर भादंवि कलमांखाली 100 दिवसांत आरोपपत्र दाखल करावे लागते.

दरम्यान, महाराष्ट्रातील अँटी टेरर स्क्‍वॉडकडून (एटीएस) मुंबईतील नालासोपारा येथे तिघा संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांना पुणे येथे नेण्यात आले असून कर्नाटकातील विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांची चौकशी करत आहे. संशयितांकडून जप्‍त केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली पिस्तूल असल्याचा संशय असून, त्या द‍ृष्टीने तपास सुरू आहे.

10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे एटीएसने कारवाई करून वैभव राऊत (40), सुधन्व गोंधळेकर (39) आणि शरद कळसकर (25) यांना अटक केली होती. सुधन्वकडून 11 पिस्तूल आणि बॉम्ब जप्‍त करण्यात आले. गौरी लंकेश हत्येतील मास्टरमाईंड अमोल काळे याचा या संशयितांबरोबर संपर्क होता. त्याने दिलेल्या सुगाव्यानंतर नालासोपारा येथे छापा घालण्यात आला होता.

गौरी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल एसआयटीच्या ताब्यात असल्याचे समजते. 7.65 एमएमची पिस्तूल हत्येसाठी वापरण्यात आली होती. त्याचा शोध घेतला जात आहे. शरद कळसकरच्या नावाचा उल्‍लेख काळेच्या डायरीत सापडला आहे. पण, हत्येतील त्याच्या भूमिकेबाबत कोणतीच स्पष्ट माहिती मिळालेली नाही. प्रकरणातील प्रमुख संशयित सुजीतकुमार ऊर्फ प्रवीण हा हत्येनंतर काही दिवस सुरतमध्ये होता. त्याला कळसकरने आसरा दिल्याची माहिती मिळाल्याने एसआयटीकडून त्याचा सुगावा शोधला जात आहे.दाभोलकर, पानसरे आणि डॉ.कलबुर्गी  हत्यांमागे या संशयितांचा हात असून त्याबाबतचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. 31 मे रोजी अमोल काळेला अटक केल्यानंतर त्याच्या डायरीत निहाल ऊर्फ दादाचे नाव होते. संशयित वाघमारे यानेही चौकशीवेळी निहालचे नाव ऐकल्याचे सांगितले.

हत्यांसाठीच 22 जणांना प्रशिक्षण

केवळ विचारवंत आणि पुरोगामी व्यक्‍तींच्या हत्येसाठीच 22 जणांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मास्टरमाईंड अमोल काळेने 60 जणांना संघटनेत प्रवेश दिला होता. त्या सर्वांची आवश्यक माहिती त्याने डायरीत लिहून ठेवली. त्यापैकी 22 जणांची निवड त्याने प्रशिक्षणासाठी केली. त्या सर्वांना बेळगावातील भरत कुरणेच्या जांबोटीजवळच्या (ता. खानापूर) येथे असणार्‍या शेतात तसेच मडिकेरी, गोवा आणि पुणे येथील निर्जन ठिकाणी ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या केवळ काहीजणांची माहिती मिळाली आहे. याबाबत महाराष्ट्र आणि गोवा पोलिसांना कळविण्यात आले आहे.