Mon, Jul 15, 2019 23:54होमपेज › Belgaon › नेतृत्वाअभावी खानापूरच्या विकासाला खीळ

नेतृत्वाअभावी खानापूरच्या विकासाला खीळ

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 06 2018 10:53PMखानापूर : राजू कुंभार

विकासकाबाबतची उदासीनता, गटबाजी, पाठपुराव्याचा अभाव आणि उत्तम नेतृत्वाअभावी खानापूरच्या विकासाला खीळ बसली आहे. पाच वर्षांत ज्या समस्यांनी शहरवासीयांना विकासाच्या दृष्टीने विचार करण्यास भाग पाडले, त्या सोडविणारे, शहरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविणारे नेतृत्व निवडण्याची संधी शहरवासीयांना मिळाली आहे. माजी नगरसवेकांना अस्तित्वासाठी कसरत करावी लागणार आहे. यात मोठे बदलही होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते.

शहरांतर्गत महामार्गाच्या दुपदरीकरणाचे निकृष्ट काम, वाहतुकीची समस्या, अतिक्रमण, गटारींचा अभाव, भुयारी गटार, पाणी पुरवठा, उपनगरांच्या समस्या, कचरा व्यवस्थापन, दुकानगाळे आदी समस्या आणि त्यासंदर्भातील प्रस्ताव धूळ खात आहेत. गटबाजी, स्थानिक राजकारण आणि नगरसेवकांतील बेदिली विकासाच्या आड आली. अलिकडच्या काळात नगर पंचायतीकडून शहरविकासाच्या दृष्टीने प्रयत्न झालेले नाहीत 

यापूर्वी काँग्रेस नेते रफिक खानापुरी यांनी शहरविकासाच्या दृष्टीने ठोकताळे बांधले होते. शहरांतर्गत महामार्गाचे रुंदीकरण आणि भुयारी गटार योजनेसाठी त्यांनी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्रयत्न केले होते. मात्र असफल राहिलेे. माजी आ. कै. प्रल्हाद रेमाणी यांनी शहर विकासासाठी बर्‍यापैकी प्रयत्न केले. त्यांनी येथील नदीघाटासाठी प्रयत्न करून त्याचे काम पूर्ण करून घेतले. त्यांनीच शहरांतर्गत महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. 

ड्रेनेजची समस्या अशाच प्रकारे गेल्या अनेकवर्षांपासून जशाच तशीच आहे. रेमाणी यांनी प्रस्तावास मंजुरी मिळविण्यासाठी  अथक प्रयत्न केले.  यानंतर नगरसेवकांकडून प्रयत्न झाले नाहीत. यामुळे हा प्रस्ताव दोन वर्षे धूळ खात पडला आहे. तत्पूर्वी एकाही आमदाराने नगर पंचायतीच्या राजकारणात वा विकासासाठीच्या कार्यात सहभाग घेतला नव्हता. माजी.आ. अरविंद पाटील यांनी म्हणावे तसे लक्ष दिलेे नाही.  
निवडणूका करायच्या आणि नगरपंचायतीतील खुर्च्या गरम करायच्या याव्यतिरिक्त नगरसेवकांनी काहीच केले नाही, असे नागरिक म्हणतात. चोवीस तास पाणी पुरवठा  आणि भुयारी गटारीचा प्रस्ताव तीन वर्षांपासून धूळ खात पडून होता. यासाठी लोकप्रतिनिधी आणि नगर पंचायतीकडून प्रभावी प्रयत्न झाले असते तर यावर्षी या कामाची पूर्तता झाली असती. त्याउलट त्यांनी जबाबदारी झटकून ते आपले काम नाही असा आव आणला.

पाच वर्षात पहिल्या नगराध्यक्षा फकिरव्वा गुडलार या काँगे्रसच्या. शिवाय त्यांना नगराध्यक्षपदापर्यंत पोहचविण्यात काँग्रेस नेते रफिक खानापुरींचा हात होता. एकेकाळी शहर विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी धडपडणार्‍या खानापुरींसाठी ही सुवर्णसंधी होती. पण त्यांचे इरादे तकलादू ठरले. नंतर नगराध्यक्षपदी विराजमान कै. अजिम तेलगी यांनी सर्व नगरसेवकांतील मतभेद संपुष्टात आणून विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले. दरम्यान, पक्षीय राजकारणाचा फटका त्यांनाही सोसावा लागला. माजी आ. अरविंद पाटील यांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनाही  सर्वसामान्य नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. विधानसभेच्या निवडणुका जवळ येताच  अरविंद पाटील यांनी शहर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची ग्वाही दिली. होती. परंतु  त्यांच्याकडूनही तसे प्रयत्न झालेले नाहीत. नगर पंचायतीत राजकारणाचे पत्ते खेळण्यात आघाडीवर राहणारे नगरसेवक विकासाच्या आड येत असल्याचे चित्र नेहमी पाहावयास मिळते. जे नवखे आहेत, त्यांना विकास साधण्यात स्वारस्य नाही.  नेत्यांमध्येसुध्दा शहरविकासाची आसक्ती नाही.