Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Belgaon › बेनाडीचा चेहरामोहरा बदलणार

बेनाडीचा चेहरामोहरा बदलणार

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 11:17PMबेनाडी : पांडुरंग मधाळे

केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण विकास आणि महिला सशक्‍तीकरण योजनेसाठी बेनाडी गावाची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर गावचा चेहरामोहरा बलणार आहे.

सदर योजनेनुसार खेडेगावांचा विकास व्हावा, आधुनिक यंत्रणा खेडे गावापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करण्यात येत आहे. प्राथमिक तयारी म्हणून गावातील प्रत्येक वॉर्डात एक महिला कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात येत आहे. 8 वी ते 10 वी शिक्षण झालेल्या महिलांना  योजनेतील कामात समाविष्ठ करण्यात येणार आहे.

निपाणी तालुक्यातील बेनाडी या एकाच गावची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. या योजनेनुसार 25 वर्षे प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण गावात प्रत्येक घरात सोलर सिस्टीम बसविण्यात येणार असून देखभाल कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. सोलर यंत्रणा घरच्या छतावर बसविण्यासाठी नागरिकांना कोणताही शुल्क भरावा लागणार नाही. सर्व खर्च कंपनीतर्फे करण्यात येणार आहे.

योजनेत काम करणार्‍या महिलांना बल्ब, टीव्ही, फ्रीज, फॅन इतर विद्युत उपकरणे यांची माहिती गोळा करुन विहीत नमुन्यातील फॉर्मवरील 42 प्रश्‍नांची उत्तरे घेण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. ग्रा. पं. ला मध्यस्ती घेऊन कार्यान्वित होणार्‍या या योजनेतून सोलर सिस्टीम बसविणार्‍या कुटुंबांचे प्रतिमहिना येणारे बिल चार-पाच वर्षे ग्रा. पं. मध्ये भरावे लागणार आहे. 

प्रत्येक पाच वर्षानंतर पूर्णपणे मोफत वीजपुरवठा या योजनेतून मिळणार आहे. योजनेनुसार दुसर्‍या टप्प्यात गावात स्वच्छता, वायफाय, रस्ते, पिण्याचे पाणी, हॉस्पिटल सुविधा, औषधे कमी किमतीत पुरविणे, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून विविध सुविधा गावपातळीवर उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे.

विक्रमजी एन. एम. पी. या वैज्ञानिकाच्या र्मागदर्शनाखाली ग्रामीण विकास आणि महिला सशक्‍तीकरण योजनेतील सर्व कामकाज चालणार  आहे. सध्या चार प्रतिनिधींची एक  कमिटी गावातील लोकसंख्या, भौगोलिक स्थिती, अन्य माहिती व जनजागृती करण्याचे काम करत आहे. काही दिवसात या योजनेचे प्रमुख विक्रमजी एन.एम.पी. यांच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ होणार आहे.