होमपेज › Belgaon › उद्या तपपूर्ती साहित्य संमेलन

उद्या तपपूर्ती साहित्य संमेलन

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 22 2017 8:47PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सांबरा येथील मायमराठी साहित्य संघातर्फे तपपूर्ती साहित्य संमेलन रविवार दि. 24 रोजी आयोजित करण्यात आले  आहे. अध्यक्षपदी संतसाहित्याचे गाढे अभ्यासक उल्हास पवार राहणार असून मान्यवरांची भाषणे, व्याख्यान आणि मुलाखत घेण्यात येणार आहे.

साहित्यिकांचा परिचय...

संमेलनाध्यक्ष उल्हास पवार

उल्हास पवार (पुणे) हे संतसाहित्याचे गाढे अभ्यासक असून ते ‘ज्ञानोबा ते विनोबा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा संत साहित्याचा सखोल अभ्यास असून रसाळ वाणीतून ते संत साहित्यावर उत्कृष्ट मार्गदर्शन करतात. साहित्य क्षेत्राबरोबर त्यांची जडण-घडण राजकारणात झाली आहे. काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात कार्यरत असून त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.राजदत्त दुसर्‍या सत्रात मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची मुलाखत प्रा. अनिल चौधरी घेणार आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या प्रतिभेने राजदत्त यांनी स्वतंत्र असा ठसा उमटविला आहे. त्यांनी मधुचंद्र, घरची राणी, अपराध, धाकटी बहुण, देवमाणूस, झेप, वर्‍हाडी आणि वाजंत्री, भोळीभाबडी, या सुुखानो या, देवकीनंदन गोपाला, चंद्र होता साक्षीला या साररख्या 28 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना 3 राष्ट्रीय पुरस्कार, तर 13 वेळा राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांना कलामहर्षी बाबुराव पेंटर सन्मानदेखील मिळाला आहे. संमेलनात ते आपला जीवनप्रवास उलघडणार आहेत.

डॉ. विजया वाड

लेखिका आणि बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी 2005 पासून मराठी विश्‍वकोश मंडळाच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी मुलांसाठी दर्जेदार साहित्यनिर्मिती केली आहे. पदपथावरील मुलांसाठी गाणी, गोष्टी, छंदवर्ग, गावोगावी कुमार-बालमेळावे भरविले आहेत. त्याचबरोबर मराठी भाषाप्रकल्प, प्रमाण भाषा प्रकल्प, वाचनवेग प्रकल्प, पौगंडावस्थेतील भारतीय मुलींच्या समस्या या विषयावर अमेरिका, लंडन, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस येथे व्याख्याने दिली आहेत. त्यांनी कथा, कादंबरी, नाटके, कविता, प्रवासवर्णन, बालकादंबर्‍या, बालकविता, बालनाटके, बालचित्रपट आदी क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.

चित्रकार सूर्यकांत निंबाळकर

बेळगाव परिसरात होणार्‍या संमेलनामध्ये प्रथमच चित्रकलेचे सत्र होणार आहे. संमेलनात चित्रकार निंबाळकर हे चित्र रेखाटणार असून हा अभिनव प्रयोग सांबरा संमेलनात राबविण्यात येणार आहे. त्यांनी 15 हजारहून अधिक चित्रे रेखाटली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चित्रप्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांना अ. भा. हँडलूम्स, लँडस्केप, राजाराम आर्ट गॅलरी कोल्हापूर यांचा पुरस्कार मिळाला आहे.