Fri, Nov 16, 2018 12:59होमपेज › Belgaon › बेळगावला अवकाळीचा जोरदार तडाखा

बेळगावला अवकाळीचा जोरदार तडाखा

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 2:01AMबेळगाव : प्रतिनिधी  

शहर परिसराला रविवारी (दि. 6) दुपारी वळिवाने झोडपून काढले. सुमारे दोन तास वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने शहर, उपनगराच्या सखल भागात पाणी साचले. भोई गल्लीत दोन फूट पाणी तुंबले तर काही अपार्टमेंटस्मधील तळघर पावसाच्या पाण्याने भरले. कॉलेज रोडवरील वनिता विद्यालयासमोर झाडाच्या फांद्या मोडून पडल्या. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.  याआधी शुक्रवारी वळिवाने हजेरी लावली होती. त्यानंतर  शहरवासीयांना गारवा अनुभवावयास मिळाला होता. मात्र, दुसर्‍या दिवसापासून उष्म्यात कमालीची वाढ झाली होती. 

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पाऊस सुरू झाला. साडेचार वाजेपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली. वादळी पावसाचा फटका शहरातील भोई गल्ली, पांगुळ गल्लीला बसला.या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी दोन फूट पाणी तुंबले. येथील अनेक घरात पाणी शिरले.

पांगुळ गल्लीतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये तळघरात पाणी तुंबल्याने पार्किंग केलेल्या बहुतांशी कार पाण्यात बुडाल्या.रहिवाशांनी घरात शिरलेले पाणी मोटार लावून बाहेर काढले. माजी नगरसेवक रायमन वाझ यांनी परिसरातील नागरिकांना सूचना करीत महापालिका अधिकार्‍यांना याची माहिती दिली. कडोलकर गल्लीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कडोली, उचगाव, सांबरा, वडगाव परिसरात वळीवाने झोडपले असून अनेक शेतकर्‍यांच्या सुक्या चार्‍याचे नुकसान झाले आहे. वळिवाचा पाऊस पेरणीपूर्व मशागतीला उपयुक्‍त असला तरी भाजी उत्पादनावर याचा परिणाम जाणवणार आहे.