बेळगाव : प्रतिनिधी
बेळगावात शंभरहून अधिक गवळी बांधव आहेत. ते आपली जनावरे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत चारतात. मात्र आठवडाभरापासून हद्दीत जनावरे चारण्यास बंदी घातल्याने या पाळीव जनावरांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासबंधी गवळी बांधवांनी पतंप्रधान व सरंक्षणमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार करून दाद मागण्याच्या हालचाली चालवल्या आहेत.
यासंदर्भात 31 जुलै रोजी 40 हून अधिक गवळी बांधवांनी ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांची भेट घेऊन कॅन्टोन्मेंट हद्दीत जनावरे चारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मात्र त्यांनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पूर्वीपासून बेळगावातील गवळी बांधव कॅन्टोन्मेंट हद्दीतील कुरणावर आपली जनावरे चारत आले आहेत. लक्ष्मीटेकडीपासून कमांडो एरियापर्यंत जनावरे चारण्यास बंदी घातली आहे. यामुळे बेळगावातील शंभरहून अधिक गवळी बांधवांच्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेळगावमध्ये चारा विकण्यासाठी येतो. मात्र त्या चार्यावर जनावरे जगविणे मुश्कील आहे. कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेल्या बंगल्यात प्रवेश करणारी जनावरे भटकी आहेत. पाळीव जनावरांसमवेत त्यांचा मालक असतो. गवळी बांधव जनावरांनी कॅन्टोन्मेंट हद्दीत टाकलेल्या शेणाचीदेखील उचल करुन परिसर स्वच्छ ठेवतो. जनावरे चारण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील राखीव जागा गवळी बांधवांसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी करीत आहेत. याकरिता पतंप्रधान व सरंक्षणमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्याच्या हालचाली गवळी बांधव वकिलाच्या मदतीने करीत आहे.
अरगन तलाव सौंदर्यीकरणाचे काम कॅन्टोन्मेंटने हाती घेतले असून लक्ष्मीटेकडीवरील सर्व पाणी अरगन तलावात वळविण्यात आले आहे. तलावातील गाळ, जलपर्णी, भराव बाजूला करुन नैसर्गिक स्रोत मोकळे केले आहेत, अशी माहिती ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी दिली.