Mon, Jun 17, 2019 02:27होमपेज › Belgaon › युवा मेळाव्यातून नवचैतन्याचा जागर

युवा मेळाव्यातून नवचैतन्याचा जागर

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:06PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

युवकांमध्ये मराठी भाषाभिमान, संस्कृती आणि ज्वलंत असणार्‍या सीमाप्रश्‍नांसदर्भात नवचैतन्याचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न  म. ए. समिती युवा आघाडी आयोजित युवा मेळाव्यातून यशस्वी झाला आहे.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मराठी युवकांना वेगवेगळी प्रलोभने दाखविणार्‍या राष्ट्रीय पक्षांना या युवा मेळाव्याने चांगलीच चपराक दिली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, सीमाप्रश्‍न व युवक आदी विषयांवर बेनकनहळ्ळी येथील युवा मेळाव्यात भाष्य करण्यात आले.  सीमाभागातील मराठी जनतेने गेल्या सहा दशकापासून महाराष्ट्रात जाण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. हा लढा मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह राज्य सरकारच्या कन्नड सक्‍ती धोरणातून वेळोवेळी प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, या प्रयत्नांना मराठी माणसाने  जशाच तसे उत्तर दिले आहे. 

सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी सत्तेत राहणे आवश्यक आहे. सत्तेत राहून आपल्या न्याय हक्कासाठी भांडणे रास्त ठरते. मात्र, म. ए. समिती विरोधी असणार्‍या राष्ट्रीय पक्षांनी आणि कर्नाटक सरकारने नेहमीच हा लढा दडपशाहीच्या बळावर व आमिषांच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी मराठी माणसाने न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून हा लढा सुरु ठेवला आहे. युवा आघाडीच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या युवा मेळाव्याला उपस्थित असलेला हजारोंचा जनसमूह सीमाप्रश्‍नाच्या लढ्याशी असणारी बांधीलकी दर्शवितो. या मेळाव्यामुळे म. ए. समितीच्या लढ्याला व नेतृत्वाला पुन्हा एकदा नवचैतन्य लाभले आहे.         

मेळाव्यात खंडू डोईफोडे यांनी सीमाप्रश्‍नाच्या संघर्षाला यश मिळवायचे असेल तर तुमच्यातील युवा जिवंत ठेवायला पाहिजे. सीमावासीयांच्या मनात असलेले मराठी प्रेम जिजाऊंच्या संस्कारातून,  शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेपासून निर्माण झाले आहे, असे सांगितले. माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर यांनी सीमाप्रश्‍नाचा धगधगता इतिहास मांडून सध्यस्थिती सांगितली.   या युवा मेळाव्यामुळे युवकांमध्ये उत्साह संचारला असून सीमाप्रश्‍नाच्या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे.