होमपेज › Belgaon › जागरुकतेबरोबर हवे जनजागृतीचे बळ

जागरुकतेबरोबर हवे जनजागृतीचे बळ

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 7:57PM

बुकमार्क करा
बेळगाव :  प्रतिनिधी  

तरुणांमधील वाढती व्यसनाधिनता चिंतेचा विषय बनला आहे. ओठावर मिसरूडही न फुटलेली मुले अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ लागली आहेत. बदलती जीवनशैली आणि पाश्‍चात्य संस्कृतीचा प्रभाव यामध्ये वाहत जाणार्‍या तरुणांना अंमली पदार्थाच्या जाळ्यात ओढण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. यासाठी पालकांना जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.  गेल्या काही वर्षात बेळगाव परिसरात अंमली पदार्थाची तस्करी वाढली आहे. तरूण आणि कोवळ्या वयातील मुले अंमली पदार्थाच्या जाळ्यात अडकत आहेत. आपली मुले काय करतात, कोणाच्या संगतीत आहेत, याची बहुतांश पालकांना कल्पना नसते. मुलांना वेळेवर पॉकेटमनी देणे त्यांच्या आर्थिक गरजा भागविणे याकडे लक्ष देऊन पालक आपले कर्तव्य पार पाडल्याच्या भ्रमात असतात. काही कुटुंबांमध्ये मद्यपान सुरू असते. मद्यपान आणि धूम्रपानाला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. यातूनच अनेक मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत.

गेल्या चार वर्षांच्या काळात बेळगाव परिसरात विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. इतर राज्यातून बेळगावात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ व्यसनांची संख्या अधिक आहे. त्या विद्यार्थ्यांच्या संगतीने स्थानिक विद्यार्थीही व्यसनाच्या जाळ्यात अडकत आहेत. हेरॉईन, मॅन्ड्रॅक्स, मॉफीन, केटामाईन, कोकीन, अफू, पॉपीस्ट्रॉ अशी अनेक अंमली पदार्थांची तस्करी गेल्या काही वर्षांपासून बेळगावात सुरू आहे. विदेशी प्रकारच्या अंमली पदार्थांसाठी मोठा पैसा मोजावा लागतो. त्यामुळे त्या व्यसनात गुंतलेल्यांची संख्या तुलनेत कमी आहे. याउलट गांजा, अफूच्या जाळ्यात अनेक तरुण अडकत आहेत. 

अंमली पदार्थांविरोधात कडक कायदे करण्यात आले आहेत. जागतिक स्थरावर 26 जून हा दिवस अंमली पदार्थविरोधी दिन म्हणून पाळला जातो. भारतात नार्कोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोटॅ्रॅपिक हा कायदा आहे. या कायद्याचे उल्लंघन करणार्‍याला किमान दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड आकारला जातो. कायदा कडक असतानाही देशात अंमली पदार्थाची तस्करी सुरूच आहे. सरकार आणि पोलिस खात्याच्यावतीने अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात वेळोवेळी कारवाई होत असल्याचे सांगितले जाते. मात्र पालकांमधील जागरूकता आणि युवकांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.